नांदेड : महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी २४ जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.नांदेड महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आल्यानंतर महापौरपदी शीला भवरे आणि उपमहापौरपदी विनय गिरडे पाटील यांची निवड करण्यात आली होती. मात्र काँग्रेसच्या सव्वावर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार शीला भवरे यांनी २२ मे रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी उपमहापौर गिरडे यांनी राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे त्यांना जीवनदान मिळाल्याचे मानले जात होते. मात्र १ जून रोजी नूतन महापौर म्हणून काँग्रेसच्या दीक्षा धबाले यांची निवड झाली. धबाले यांची निवड होताच १ जून रोजीच काँग्रेस आमदारांच्या उपस्थितीत विनय गिरडे यांनी आपल्या उपमहापौर पदाचा राजीनामा महापौर दीक्षा धबाले यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यामुळे हे पद रिक्त होते.या रिक्त पदाबाबत प्रशासनाने विभागीय आयुक्तांना कळविले होते. विभागीय आयुक्तांनी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून २४ जून रोजी नांदेड-वाघाळा महापालिकेची सकाळी ११ वाजता विशेष सर्वसाधारण सभा महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत होणार आहे. या विशेष सभेत उपहापौर पदाची निवडणूक घेतली जाणार आहे.उपमहापौर पदासाठी प्रशांत तिडके यांच्यासह सतीश देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी काँग्रेसकडून ऐनवेळी नवे नाव येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या धोरणानुसार आगामी कालावधीत उपमहापौरपद कोणाच्या गळ्यात पडते याकडे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेवून काँग्रेस पक्षाकडून उपमहापौरांची निवड केली जाणार आहे.
नांदेड महापालिकेच्या उपमहापौरपदाची निवडणूक २४ जून रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:24 IST
महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी २४ जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड महापालिकेच्या उपमहापौरपदाची निवडणूक २४ जून रोजी
ठळक मुद्देसव्वा वर्षाचा फॉर्म्युला विनय गिरडे यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा