स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या व्याख्यान सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन हे होते, तर अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गोणारकर म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी स्त्रियांच्या समूहाला मुक्ती मिळण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री जोपर्यंत आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी होत नाही तोपर्यंत ती कणखर बनणार नाही. त्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल आणले. आजच्या काळात डॉ. आंबेडकर यांचे विचार नीटपणे समजून घेतले तरच आपल्याला आधुनिक होता येईल.
अध्यक्षीय समारोपात प्र-कुलगुरू डॉ. बिसेन म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी उपेक्षितांसाठी लढा दिला. त्यांचा उत्कर्ष आणि उद्धार करण्यासाठी तो लढा होता. त्यांनी माणसे जोडण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळात जाती आणि धर्माच्या नावावर महापुरुषांची विभागणी झाली आहे. मात्र, डॉ. आंबेडकर हे कुठल्याही एका जातीचे किंवा समूहाचे नव्हते, तर ते अखिल विश्वाचे होते. आपल्याला भविष्याच्या नव्या वाटा उजळायच्या असतील तर त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे. व्याख्यानाला व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. वैजंता पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. डी. एम. कंधारे, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. लक्ष्मीकांत कांबळे, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. भास्कर दवणे, डॉ. कैलास अंभुरे, प्रा. बालाजी भंडारे आदी उपस्थित होते. डॉ. पी. विठ्ठल यांनी प्रास्ताविक केले.