वाळूचे ट्रॅक्टर जप्त
मांडवी - महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडून मांडवी पोलीस ठाण्यात जमा केले. २४ मे रोजी सकाळी रामपूर येथे एक ट्रॅक्टर, तर मांडवी येथे दुसरा ट्रॅक्टर पकडण्यात आला. तलाठी पी.व्ही. हाके, के.आर. कदम, एफ.व्ही. खैरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
टपालसेवेची मागणी
किनवट- किनवट आगारातून गेल्या एक महिन्यापासून परिवहन महामंडळाची बससेवा बंद आहे. दररोज टपाल बससेवा सुरू झाल्यास किमान टपाल तरी पोहोचते होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त करून टपालसेवेची मागणी केली जात आहे.
महामार्गावर जागोजागी खड्डे
हदगाव- तुळजापूर ते नागपूर महामार्गावर वारंगा ते हदगाव यादरम्यान ठिकठिकाणी तडे गेले आहेत. काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. चुंचा, बामणीफाटा आणि पळसा येथील ओव्हरब्रिजचे कामही अर्धवट आहे. झालेले कामही निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. महामार्गावर सुती बारदाना न टाकता प्लास्टिक पत्रे टाकून क्युरिंग करण्यात आल्याने ओलावा निर्माण झाला नसल्याने जागोजागी तडे गेले आहेत.
२२ वर्षीय तरुण बेपत्ता
धर्माबाद - तालुक्यातील नायगाव (ध) येथील २२ वर्षीय लिंगराम मनुरे हा १७ मे पासून बेपत्ता आहे. तो शिक्षित आहे. बाहेर देशात नोकरी करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो गावी परतला होता. वर्षभरात त्याला काही काम न मिळाल्याने तो अस्वस्थ होता. यातूनच तो घराबाहेर पडला असावा, अशी चर्चा आहे.
गाळउपसा कार्यक्रम
उमरी - तालुक्यातील मौजे कारला येथील तलावातील गाळउपसा कार्यक्रमाचे उद्घाटन मारोतराव कवळे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग देशमुख, शिवसेनेचे सुभाष पेरेवार, सरपंच प्रभाकर पुयड, मारोती वाघमारे, मारोती पाटील, सरपंच राजू कसबे, संदीप पाटील कवळे, आनंदराव पाटील, मोहनराव पाटील, पंजाब पाटील, शंकर कवळे, माधवराव फुलकंटे, हैदरखान पठाण आदी उपस्थित होते.