नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाच्या रक्कमेतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका एक हजार रुपये कपात करून घेत आहेत. या कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत नवीन मोंढा भागातील बँकेचे सेटर लावून बँक अधिकारी कर्मचाऱ्यांना काही काळ आत कोंडले होते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान बँकांमध्ये जमा करण्यात आले आहे. परंतु नांदेड जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सदर अनुदानातून एक हजार रुपये कपात करून घेत आहेत. गतवर्षी देखील अशाच पद्धतीने 1 हजार रुपये कपात करून घेतले होते. परंतु त्याच्या पावत्या दिल्या नाही. यंदा देखील तोच फॉर्म्युला वापरून बँका 1 हजार रुपये लाटू पहात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नांदेडमधील नवीन मोंढा परिसरात असलेल्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला टाळे लावून काही काळ अधिकारी कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवलं होतं.