नांदेड: जिल्ह्यात सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. दररोज जिल्ह्यात जवळपास २७ ते २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठीही वेटिंग आहे. रुग्णालयातील मयतालाही रुग्णवाहिकेसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून या शववाहिका चालकांचा मृत्यूसोबत प्रवास सुरू आहे. यातील अनेकांना कोरोनाची लागण ही झाली आहे, परंतु त्यानंतरही त्यांची सेवा सुरू आहे.
महापालिका हद्दीत आजघडीला ४१ रुग्णवाहिका आहेत. या सर्व रुग्णवाहिकेवर एकच चालक असतो. रुग्णाला इतर जिल्ह्यात पाठवायचे असल्यास, मात्र एखाद्या डॉक्टरची व्यवस्था करावी लागते. या रुग्णवाहिका चालकाला प्रशासनाकडून पीपीई किट किंवा साधे सॅनिटायझरही पुरवठा करण्यात येत नाही. जीव धोक्यात घालून त्यांचा हा मृत्यूसोबत प्रवास सुरू आहे.
महापालिकेच्या रुग्णवाहिकेवर आहे, परंतु सध्या कोरोनाची लागण झाल्याने क्वांरटाइन आहे. सुरुवातीच्या काळात पीपीई किट घातली होती, परंतु अवघ्या तासाभरातच अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. त्यामुळे इतर इन्फेक्शन होण्याचा धोकाच अधिक आहे. दररोज होणारे मृत्यू पाहून मन सुन्न होत आहे.
- साईनाथ बादेवाड
रुग्णवाहिकेवर एकटाच चालक आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे रुग्ण आणि मयतांची वाहतूक करीत आहे. जेवणाच्या अन् झोपीच्या वेळा नाहीत. रात्री घरी जातानाही मनात भीती असते. दिवसभर पीपीई किट घालून राहणेही शक्य नाही, परंतु कर्तव्य तर बजावावे लागत आहे.
- अशोक देशमुख
गेल्या वर्षभरात अनेक मयताना गोवर्धन घाटावर पोहोचविले. या ठिकाणी नातेवाइकांचा आक्रोश पाहून मन सुन्न होते. अंत्यसंस्कारासाठीही आता रांगा लागल्या आहेत. आणखी किती दिवस मृत्यूचे हे तांडव सुरू राहील, हे सांगता येत नाही, परंतु मनात मात्र दररोज भीती वाटते. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
- शेख इब्राहिम