नांदेड : बांधकाम केलेल्या छताला पाईपने पाणी देत असताना महावितरणच्या खांबावरील तुटलेल्या उघड्या तारेला स्पर्श झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणात महावितरणने नुकसानभरपाई म्हणून २ लाख ७३ हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. माहूर तालुक्यातील आदर्श कॉलनी येथील रहिवासी नागनाथ शिवशंकर हुसे हा तरुण २७ जून २०१४ रोजी वडिलांच्या मालकीच्या पूसद रोड येथील हॉटेल कुलस्वामिनीच्या छतावर पाईपने पाणी मारत होता. हॉटेलच्या अगदी जवळून गेलेल्या महावितरणच्या लोंबकळत असलेल्या ताराला नागनाथ याचा स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात त्याचे हात आणि पाय जळले होते. या घटनेनंतर हुसे यांनी महावितरणकडे नुकसानभरपाईसाठी अनेकवेळा विनंती केली. परंतु, महावितरणने प्रतिसाद दिला नाही. अखेर नागनाथ हुसे यांनी महावितरण कंपनीविरोधात ३ मार्च २०१६ रोजी नांदेडातील दिवाणी न्यायालयात ॲड. सुधाकर पाटील-सावरगांवकर यांच्यावतीने दावा दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर या अपघातासाठी महावितरण कंपनीला जबाबदार ठरवत जखमी तरुणाला २ लाख १० हजार रुपये आणि आतापर्यंतचे ६ टक्के व्याज याप्रमाणे २ लाख ७३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
महावितरणला न्यायालयाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST