नांदेड: कोरोनाच्या प्रादुर्भावात वयोवृद्ध रुग्णांबद्दल अनेक गैरसमज दिसून येतात. परंतु, नांदेडच्या सिडको-हडको परिसरातील ८६ वर्षीय सेवानिवृत्त ग्रामसेवक गणपतराव वडजे टेंभुर्णीकर आणि त्यांची ७८ वर्षीय पत्नी यांनी कोरोनावर मात करून सर्व गैरसमजांना छेद दिला आहे. कोरोनाबाधित झाल्यास घाबरून न जाता प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाला सहज हरवता येते असे आवाहन गणपतराव वडजे यांनी केले आहे.
सेवानिवृत्त ग्रामसेवक गणपतराव वडजे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. कुठल्याही परिस्थितीत खंबीर राहण्याची वृत्ती असल्याने या कोरोना संकटालासुद्धा ते तसेच सामोरे गेले. विशेष बाब म्हणजे, वडजे यांना गेल्या काही वर्षांपासून अस्थमा, मधुमेह व रक्तदाबाचा आजार आहे. अशी प्रकृती असताना त्यांना कोरोनाने गाठल्याने सर्वाना चिंता वाटत होती. मात्र, डॉक्टरांचे तब्बल नऊ दिवसांचे अथक परिश्रम आणि वडजे यांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर यशस्वीपणे मात केली. दरम्यान, गणपतराव वडजे यांच्यासोबतच त्यांची ७८ वर्षीय पत्नी भागिरथीबाई वडजे यादेखील कोरोनावर मात करून घरी परत आल्या आहेत. वयोवृद्ध आई-वडील कोरोनावर मत करून घरी आल्याने सामाजिक कार्यकर्ते श्याम वडजे यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.