श्रीनिवास भोसले।नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज, शंभुराजे यांची भूमिका करायला मिळणे हे भाग्य असून जीवन सार्थ झाले, असे वाटते़ आज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेत छत्रपती शंभूराजेंची भूमिका साकारत असताना सातासमुद्रापार ओळख मिळाली, असे मत अभिनेता डॉ़अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले़मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ या मालिकेत संभाजी महाराज यांची भूमिका करणारे डॉ़अमोल कोल्हे हे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त नांदेडात आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़महाराष्ट्राच्या मराठी मातीला संस्कार देण्याचे काम छत्रपती शिवराय, संभाजी महाराज यांनी केलं आहे़ परंतु, आजही महाराष्ट्रात राहणाऱ्या बहुतांश लोकांना शंभुराजेंचा इतिहास माहिती नाही, हे आपलं दुर्दैव असल्याची खंत डॉ़अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली़ येणाºया प्रत्येक पिढीला हिटलर, नेपोलियन बोनापार्ट माहिती असेल, पण स्वराज्याचे दुसरे छत्रपती माहिती नसतील, असे चित्र निर्माण होवू नये़ प्रत्येक घरा - घरात मनामनात स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे यांनी स्वराज्यासाठी, या महाराष्ट्राच्या मातीसाठी केलेला त्याग आणि त्यांचे कार्य पोहोचविण्याचे कार्य ‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ मालिकेच्या माध्यमातून करीत असल्याचे त्यांनी सांगितले़ एखाद्या व्यक्तीचे बलिदान सर्वसामान्य माणसासाठी प्रेरणा ठरते, हे जगाच्या इतिहासात एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शंभुराजेंचे बलिदान असल्याचेही त्यांनी सांगितले़ छत्रपती शिवाजी महाराज, शंभुराजे यांचा इतिहास एका चित्रपटात बसू शकत नाही़ तसा हट्ट करून त्यांचे कार्य कोंबून चित्रपटात बसविण्याचा विषय नाही़ त्यामुळे शिवरायांवर तीन चित्रपटांची मालिका काढण्याचा आपला मानस आहे़ स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर शंभुराजेंवरदेखील चित्रपट काढणार असल्याचे त्यांनी सांगितले़छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्य बुडालं असं वाटत असताना धाडसानं पुन्हा स्वराज्य उभं करणाºया छत्रपती शंभुराजे यांचा राज्याभिषेक सोहळ्याचा क्षण प्रत्यक्षात रायगडावर चित्रीत करण्याचा मनोदय असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे़ रायगडावर दहा ते पंधरा हजारांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळ्याचे चित्रीकरण होणे हा मालिका विश्वातील मोेठा इतिहास होईल, असेही त्यांनी सांगितले़ या कार्यासाठी अनेक हात पुढे येत असून र् सामान्य माणूसदेखील स्वयंस्फुर्तपणे येत असल्याने राजांवर असणारी निष्ठा, त्यांच्यावरील प्रेमातूनच शंभुराजेंची कलाकृती माणसाच्या मनामनात कोरली गेली असल्याचे भावना त्यांनी व्यक्त केली़चित्रपट, मालिकेत पात्र करताना त्या व्यक्तीचे विचार, संस्कार आत्मसात करून जबाबदरीने भूमिका साकारणे जिकरीचे काम असते़ अभिनय करताना भिती वाटत नाही़ परंतु, शभुंराजेंच्या पेहरावामुळे एक वेगळी जबाबदारी असल्याचे दडपण असते, असे डॉ़अमोल कोल्हे म्हणाले़शंभुराजांवरील प्रेमामुळे आज मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच नव्हे तर देश- विदेशातूनही या मालिकेस प्रतिसाद मिळत आहे़ शंभुराजेंचा इतिहास झी मराठीच्या माध्यमातून जवळपास १४७ देशात पोहोचला आहे़ नायझेरीया, न्युझीलंड, युके, युएस आदी देशातून मालिका पाहत असल्याचे पत्र येतात़ त्यामुळे ही मालिका एक मनोरंजन नव्हे तर मराठी मातीचा संस्कार बनल्याचा विश्वास डॉ़अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला़छत्रपती शंभूराजांचा अभिनय करणं आव्हानात्मक होतंशिवराय हे चौथीच्या पाठ्यपुस्तकात, कांदबरी, नाटकाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहेत़ परंतु, शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतरचा इतिहास फारसा ज्ञात नाही़ छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकरण्यापेक्षा शंभुराजेंचा अभिनय आव्हानात्मक होते़ शंभुराजेंची कारकिर्द ही त्यानंतरची असल्याने त्यांचे पात्र निभावणे हे जिकरीचे काम होते़ परंतु, शिवराय अन् शंभुराजेंच्या विचाराने हे धाडस करण्याचे कार्य आपण केल्याचे डॉ़अमोल कोल्हे यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले़दीर्घकालिन राष्ट्रउभारणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावाशिवराय, शंभुराजेंसारखी दाढी-मिशी ठेवून युवकांनी स्वत:ला मिरवू नये, तर त्यांच्या विचारांचे पाईक होणे गरजेचे आहे़ उत्तुंग अन् उद्दात ध्येय ठेवून वाटचाल करावी, तत्कालिक यशाचा मोह न ठेवता दिर्घकालिन राष्ट्र उभारणीसाठी कार्य करावे.रायगड पुनर्उभारणीचे स्वप्नछत्रपती शिवरायांच्या काळात रायगड ज्या डोलात स्वराज्याची राजधानी म्हणून उभा होता़ त्याच दिमाखात पुन्हा रायगड पूर्ववत करण्याचे स्वप्न उराशी बाळगून काम करत आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्यानंतरच्या झोळीत मिळणाºया उत्पन्नातून रायगड पुनर्उभारणी करणार असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी आवर्जून सांगितले़
छत्रपती शंभूराजेंच्या भूमिकेने सातासमुद्रापार पोहोचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:07 IST
छत्रपती शिवाजी महाराज, शंभुराजे यांची भूमिका करायला मिळणे हे भाग्य असून जीवन सार्थ झाले, असे वाटते़ आज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेत छत्रपती शंभूराजेंची भूमिका साकारत असताना सातासमुद्रापार ओळख मिळाली, असे मत अभिनेता डॉ़अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले़
छत्रपती शंभूराजेंच्या भूमिकेने सातासमुद्रापार पोहोचविले
ठळक मुद्देअमोल कोल्हे : शिवरायांवरील तीन चित्रपटांची मालिका काढण्याचा मानस