निवडीचा जल्लोष
धर्माबाद- राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांची जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धर्माबाद तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तालुकाध्यक्ष नागेंद्र पाटील, माजी नगरसेवक रवींद्र शेट्टी, पंडित पाटील, मोहसीन खान, राष्ट्रवादीचे गटनेते भोजराज गोणारकर, सुधाकर जाधव, सय्यद सुलताना बेगम, हनमंत किरकोळ आदी उपस्थित होते.
मुद्रांक पेपरचा तुटवडा
देगलूर- येथील मुद्रांक विक्रेत्यांकडे मुद्रांक पेपर उपलब्ध नसल्याने अनेकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. मागील १५ दिवसांपासून हे चित्र आहे देगलुरात ६ ते ७ मुद्रांक विक्रेते असून १०० ते ५ हजार रुपये पर्यंतचे मुद्रांक पेपर विक्री केले जातात. विविध कामासाठी मुद्रांक विक्रीची गरज आहे. मात्र १५ दिवसांपासून पेपर मिळत नाही.
पोहरादेवी यात्रा रद्द
माहूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १८ ते २२ एप्रिल दरम्यान भरणारी पोहरादेवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय वाशिम जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या काळात भाविकांना पोहरादेवी गडावर येता येणार नाही. तसे आदेशही जारी करण्यात आले. आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
विनाकारण फिरु नका
लोहा- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा. विनाकारण रस्त्यावर फिरु नका, असे आवाहन लोहाचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही परळीकर यांनी केले.
दिव्यांगांना निधी वाटप
अर्धापूर- तालुक्यातील लोणी खु. ग्रामपंचायतच्या वतीने भीम जयंतीनिमित्त १४ व्या वित्त आयोगातून ५ टक्के प्रमाणे ११ दिव्यांगांना ५५ हजार रुपये वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच अनुसयाबाई लोणे, उपसरपंच संभाजी लोणे, बाजार समितीचे संचालक संजय लोणे, ग्रा.पं. सदस्य सुनील पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अनेकांनी परिश्रम घेतले.
लसीकरणाला प्रतिसाद
अर्धापूर- तालुक्यातील लोणी बु. येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी सरपंच अनुसयाबाई लोणे, उपसरपंच विजय लोणे उपस्थित होते. यावेळी गावातील ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली. १९६ जणांनी लस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मोफत वितरण सुरू
बिलोली- शहरातील नवीन बसस्थानक मोफत शिवभोजन थाळी वितरण सुरू आहे. दोन चपाती, भात, भाजी, वरण दिले जात आहे. एक महिना भोजन मोफत दिले जाईल. नागरिकांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.