जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकिय सेवा सुविधा आवश्यक जरी असल्या तरी याचा आणखी प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेची आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यामध्ये मोठा मानसिक तणाव निर्माण झाल्याचे आपण पाहतो. या तणावातून असख्यं नातेवाईक कोरोनाच्या वार्डात स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन वावरतांना दिसत आहेत. यातून बाधित होणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. नातेवाईक आणि रुग्ण यांच्यात विश्वासात्मक समन्वय साधण्यासाठी सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी योगदान द्यावे असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. पुढील तीन दिवसांत हे सेंटर रूग्णसेवेत रुजू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सुमारे २०० खाटांच्या या जंबो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन तसेच बायपेप व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध असणार आहे. दरम्यान, यावेळी जिल्हाधिकारी, इतर प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधींशी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोना परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी तात्काळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दूरध्वनी करून नांदेड जिल्ह्याला अधिक प्रमाणात रेमडेसिविरच्या पुरवठ्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. टोपे यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचे ते पालकमंत्र्यांना म्हणाले.