जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेलवर ८ मे रोजी धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता. त्यात त्वरित दहा कोटी रुपये द्यावे आणि दर महिन्याला सुरक्षेचा कर म्हणून पाच कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. १२५ हॉटस्पॉटमध्ये विष्णूपुरी धरण, थर्मल पाॅवर स्टेशन, मेडिकल कॉलेज, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, खासगी दवाखाने तसेच जिल्ह्यातील सर्व बँका, शासकीय कार्यालये यांचा समावेश होता. या प्रकरणात सरकारी वकील ॲड. सुनंदा चावरे यांनी आरोपीचा कोणत्या घातपात करण्याच्या संघटनेशी संबंध आहे काय? कोणत्या उद्देशाने त्याने हा मेल पाठविला, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे मुद्दे न्यायालयात मांडले. त्यानंतर न्या. सतीश हिवाळे यांनी शेख अब्दुल रफीक अब्दुल रऊफ याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आरोपी जन आरोग्यचा होता समन्वयक
सेवानिवृत्त शिक्षकाचा मुलगा असलेला शेख अब्दुल रफीक हा यापूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समन्वयक म्हणून होता. लॉकडाऊनचा फटका सर्वांनाच बसला आहे. त्यात शेख अब्दुल रफीक याला मोबाइलच्या व्यवसायात तोटा झाला होता. हा तोटा भरून काढण्यासाठी त्याने अशा प्रकारे धमकीचे मेल पाठविले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.