बारडमध्ये मटका अड्ड्यावर धाड
नांदेड- मुदखेड तालुक्यातील बारड येथे सार्वजनिक रस्त्यावर कल्याण नावाचा मटका चालवला जात होता. या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून २ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पो. कॉ. विलास डांगे यांच्या तक्रारीवरून बारड ठाण्यात गुन्हा दाखल केला.
वजिराबाद परिसरात दारू जप्त
नांदेड- शहरातील वजिराबाद भागात अवैध दारू विक्री सुरू होती. या अवैध दारू विक्रीसाठी साठा केलेली १ हजार ९९८ रुपयांची दारू २ जूनला पोलिसांनी जप्त केली. उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या तक्रारीवरून वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला.
भांडण सोडविणाऱ्यास मारहाण
नांदेड- भांडण सोडविणाऱ्यास मारहाण केल्याची घटना जुन्या नांदेडातील सिद्धनाथपुरी चौफाळा येथे १ जूनच्या रात्री घडली. वाद सुरू असताना श्रीहरी सुभाष शिंदे हे वाद सोडविण्यासाठी पुढे आले. त्यावेळी तू मध्ये का पडलास असे म्हणून त्यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिंदे यांच्या तक्रारीवरून इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल केला.
बिर्याणी लवकर दिली नाही मारहाण
नांदेड- बिर्याणी लवकर का देत नाहीस असे म्हणून खंजरने वार केल्याची घटना शहरातील इस्लामपुरा भागात घडली. देगलूरनाका येथील फंक्शन हॉलमध्ये मोहमद सलीम मो.इब्राहिम यांना आरोपींनी बिर्याणी देण्याच्या कारणावरून खंजरने मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या वादावरून दगडाने मारहाण
नांदेड- जुन्या वादावरून आणि कुत्र्याला दगड मारण्याच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना सिद्धनाथपुरी चौफाळा येथे घडली. बालाजी नारायणराव समदुरे यांना आरोपींनी जुन्या वादातून १ जूनच्या रात्री फावड्याने व दगडाने मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. समदुरे यांच्या तक्रारीवरून इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल केला.