लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : भरधाव कारच्या जोरदार धडकेने गंभीर जखमी झालेल्या दोन २२ वर्षीय तरूणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवारी नांदेड-हैदराबाद रस्त्यावरील जवाहरनगर, तुप्पा (ता.नांदेड) येथील चढावर घडली. या अपघातामुळे पुन्हा रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंटूर (ता.नायगाव बाजार जि. नांदेड) येथील दत्ता विठ्ठल गिरी व रामेश्वर गुरूलिंग मठपती (स्वामी) हे दोन तरूण शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जवाहरनगर, तुप्पा परिसरातून गावाकडे पायी जात होते.दरम्यान, याचवेळी भरधाव वेगाने जाणाºया कार (क्रमांक एमएच- २६, एस- ०६०३) ने पायी जात असलेल्या या दोन्ही तरुणांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत गिरी व स्वामी या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच रामेश्वर मठपती-स्वामी व दत्ता गिरी (रा.कुंटूर) या दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे पोलीस ठाणे अंमलदार रमेश राठोड व मदतनीस पो. कॉ. विशाल वाघमारे यांनी सांगितले.याप्रकरणी नामदेव गोविंदराव गिरी (रा.कुंटूर) यांनी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी उपरोल्लेखित कारचालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पो.नि. एस. एस. आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. राजेश जाधव व नाईक पो. कॉ. दिलीप चक्रधर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी कारचालक हा कारसह पसार झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हे दोन्ही तरुण रोजंदारीचे काम करुन कुटुंबाला हातभार लावत होते. अपघातामुळे कुटुंबाचा आधार हरवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पसार कारचालकाचा तातडीने शोध घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुंटूर ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
भरधाव वाहनधारकांवर कारवाईची मागणीमागील काही दिवसांत जिल्ह्यात घडलेल्या अपघातांच्या घटना नादुरुस्त रस्ते तसेच भरधाव वाहनांमुळे घडल्याचे पुढे आले आहे.नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यातच वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याने अपघातांच्या घटना वाढत आहेत.अशा वाहनचालकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.