नांदेड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुदैवी असल्याने त्यांना अशोक चव्हाणांसारखे समंजस व दिलदार विरोधक मिळाले; पण अशोक चव्हाण मात्र याबाबत कमनशिबी ठरले असून, त्यांच्या वाट्याला केवळ राजकारण आणि द्वेष करणारे विरोधक आल्याचे काँग्रेस महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांनी म्हटले आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाबाबत प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. नितीन गडकरी चांगले काम करतात म्हणून अशोक चव्हाण यांना त्यांची स्तुती करावी लागते. अशोक चव्हाण यांनीही चांगले काम करावे; त्यांचीदेखील स्तुती होईल, असे फडणवीस बुधवारी म्हणाले होते. याबाबत विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुदैवी आहेत की, त्यांना अशोक चव्हाणांसारखे परिपक्व आणि लोकहिताच्या प्रश्नांवर राजकारणविरहित भूमिका घेणारे जबाबदार राजकीय विरोधक मिळाले. त्यामुळे काही चांगले काम केले तर त्याबद्दल चार चांगले शब्द बोलायला अशोक चव्हाण यांची जीभ कचरत नाही.
पण दुर्दैवाने विरोधकांबाबत अशोक चव्हाण मात्र गडकरींसारखे भाग्यशाली नाहीत. त्यांच्या नशिबी प्रत्येक गोष्टीत राजकारण करणारे राजकीय विरोधक आले आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी कितीही चांगले काम केले तरी विरोधकांकडून चांगले शब्द निघणार नाहीत. अशोक चव्हाण यांनी मागील दीड वर्षांत नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम काम केले असून, विरोधकांनी राजकारणाची झापडे उतरवली तर त्यांना ते नक्कीच दिसून येईल. परंतु, राजकारण आणि विरोध हाच भाजपचा एककलमी कार्यक्रम असल्याने चव्हाणांचे चांगले काम त्यांना दिसून येत नाही, अशी खंत आ. अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केली.