सर्वसामान्यांना मागील दोन वर्षांपासून महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. इंधन, खाद्यतेल, डाळी या जीवनावश्यक वस्तूंसोबतच आता सिमेंट व स्टीलचे दर वाढल्याने घर बांधकामासाठी अडचणीचे ठरत आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीने अनेकांचे बजेट कोलमडले आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी ४० हजार रुपये टन असलेले स्टीलचे दर आता ६० ते ७० हजार रुपये; तर सिमेंट पोते ३३० वरून आता ४०० ते ४१० रुपयांपर्यंत गेले आहे. लॉकडाऊनच्या काळात दुकाने बंद असताना भाव का वाढत आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. सिमेंट उत्पादक कंपन्यांनी मनमानीपणे भाव वाढविले असून, मागणी व उत्पादन नसतानाही सिमेंट कंपन्या दर वाढवून नफा कमवीत असल्याचा विक्रेत्यांचा आरोप आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. मागील वर्षी सिमेंटचे भाव ४०० रुपयांपर्यंत पाेहोचले होते. त्याशिवाय पावसाळ्यात बांधकाम बंद असतानाही कंपन्यांनी सिमेंटचे दर वाढविले होते. बांधकाम क्षेत्रासाठी लोखंड ही महत्त्वाची वस्तू आहे. सहा महिन्यांपूर्वी स्टीलचे भाव ४० हजार रुपये टन होते, ते आता ७० हजार रुपयांवर पोहोचले आहेत. कच्चा मालाचे भाव वाढल्याने भाववाढ झाल्याचे सांगितले जात आहे. घर बांधण्यासाठी लागणारे सिमेंट, पाईप, दरवाजे, खिडक्या, आदींसह हार्डवेअरचाही खर्च दीडपटीने वाढला आहे.
चौकट-
सिमेंट व स्टीलच्या किमती वाढल्याने बांधकाम खर्चात २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. यापूर्वी बुकिंग केलेल्या ग्राहकांना आता पूर्वीच्या भावात घर बांधून देणे परवडत नसल्याने बिल्डरही अडचणीत सापडले आहेत. ज्या साईट आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, अशांना या महागाईचा चांगलाचा फटका बसला असल्याचे चित्र आहे.