ड्रंकन ड्राईव्ह प्रकरणातील आरोपींची न्यायालयात गर्दी नागपूर : होळीच्या दिवशी दारूच्या नशेत टुन्न होऊन काही जण हुल्लडबाजी करतात, वेड्यावाकड्या पद्धतीने वाहन चालवितात. त्यामुळे अपघात होऊन अनेकांचा बळी जातो. कित्येक निरपराधांना दारुड्या वाहनचालकांमुळे गंभीर दुखापत होते. अशा वाहनचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आधीच तयारी करून ठेवली होती. कारवाईच्या या जाळयात अनेक मद्यपी अडकले. घरी परतल्यावर जेव्हा मद्याचा कैफ उतरला तेव्हा हातात दंडाची नोटीस होती. हे दंड भरण्यासाठी ड्रंकन ड्राईव्ह प्रकरणातील आरोपींनी मंगळवारी न्यायमंदिर इमारतील तिसऱ्या मजल्यावरील जी. जी. कांबळे यांच्या मोटर वाहन कायद्याच्या विशेष न्यायालयात गर्दी झाली होती. रविवारी १२ मार्चच्या सायंकाळपासून दारुड्या वाहनचालकांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली. ती सोमवारी सायंकाळपर्यंत सुरूच होती. शहरातील विविध भागात अवघ्या २४ तासात ९३८ दारुड्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली तर, कर्णकर्कश आवाज करून, भोंगे (पुंग्या) फुंकत, आरडाओरड करीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. यातील ५५० आरोपींनाच आपला गुन्हा कबूल करून दंड भरला. परंतु असा दंड भरायला आलेल्या या आरोपींमुळे अचानक गर्दी वाढली व इतर न्यायालयातील कामकाजाला फटका बसून आरोपींना वेळेत पेशीवर उपस्थित होता आले नाही. आरोपींच्या वकिलांना आणि सरकारी वकिलांना वेळेवर आपापल्या न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागली. न्यायालयात दंड भरण्यासाठी रात्री ८ पर्यंत गर्दी होती. मोटर वाहन कायद्याचे केवळ एकच न्यायालय आहे. पूर्वी हे न्यायालय दगडी इमारतीमध्ये होते. त्यानंतर ते सुयोग इमारीमध्ये स्थानांतरित झाले होते. आता सुयोग इमारतीमध्ये कौटुंबिक न्यायालये स्थानांतरित झाल्याने डिसेंबरपासून मोटर वाहन कायद्याचे हे न्यायालय न्यायमंदिर इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर स्थानांतरित झाले. (प्रतिनिधी) पोलिसांचा उत्तम बंदोबस्त होळीसारखा सण म्हटला की दारूला जिकडेतिकडे उधाण येते. दारूची दुकाने बंद असूनही अनेक जण पूर्वीच व्यवस्था करून ठेवतात. धुळवडीच्या दिवशी सकाळपासूनच दारूच्या नशेत अनेक जण हैदोस घालतात. त्यामुळे हाणामाऱ्या, प्राणघातक हल्ले, खून, अपघाताच्या घटना घडतात. हे सर्व लक्षात घेता यावेळी पोलिसांनी नियोजनपूर्वक बंदोबस्त केला होता. केवळ चौकातच नव्हे तर रस्त्यारस्त्यांवर आणि गल्लीबोळातही पोलीस दिसत होते. पोलिसांची गस्ती वाहने धावताना दिसत होती. कुठे काही घडल्याचे कानावर पडताच आजूबाजूचे पोलीस लगेच धाव घेत होते. अत्यंत चांगला पोलीस बंदोबस्त असल्यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत उपराजधानीत हिंसक घटना आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अपघात वगळता इतर हिंसक घटनांची संख्या कमी झाली.
झिंग उतरली, कोर्टात दाखल
By admin | Updated: March 15, 2017 02:20 IST