हायकोर्ट : ‘आयओ’चे बयान नोंदविण्याची होती विनंतीनागपूर : तपास अधिकारी (आयओ) सत्यनारायण जयस्वाल यांचे अतिरिक्त बयान नोंदविण्यासाठी युग चांडक हत्याकांड प्रकरण सत्र न्यायालयाकडे परत पाठविण्यात यावे, अशा विनंतीसह आरोपी राजेश धनालाल दवारेचे वकील मीर नगमान अली यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज सादर केला होता. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी विविध बाबी लक्षात घेता हा अर्ज खारीज केला.सत्र न्यायालयात नोव्हेंबर-२०१५ मध्ये जयस्वाल यांचे बयान नोंदविण्यात आले होते. त्यावेळी तपासातील काही अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्यांवर त्यांची उलटतपासणी घेण्यात आली नाही. खटल्यात पारदर्शीपणा असणे आरोपीचा अधिकार आहे. यामुळे जयस्वाल यांचे अतिरिक्त बयान नोंदविण्यासाठी हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे परत पाठविण्यात यावे, असे अर्जात नमूद करण्यात आले होते. अरविंद अभिलाष सिंग (२४) हा प्रकरणातील दुसरा आरोपी आहे. राजेश कळमन्यातील वांजरी ले-आऊट, तर अरविंद जरीपटक्यातील प्रीती ले-आऊट येथील रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०१६ रोजी दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३६४ -अ (खंडणीसाठी अपहरण)अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३०२ (हत्या)अंतर्गत मरेपर्यंत फाशी व कलम २०१ (पुरावे नष्ट करणे)अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी हे प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३६६ अनुसार उच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे. तसेच दोन्ही आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले आहे. ही घटना १ सप्टेंबर २०१४ रोजी घडली होती.(प्रतिनिधी)सरकारी वकिलाचा युक्तिवाद पूर्णमुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांचा युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला. परिस्थितीजन्य पुरावे, ५० साक्षीदारांचे बयान, शवविच्छेदन व डीएनए अहवाल आणि सीडीआर यावरून आरोपींनी खंडणीसाठी युगचे अहपहरण करून त्याची हत्या केली हे सिद्ध होते, असे डांगरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांना फिर्यादीच्यावतीने अॅड. राजेंद्र डागा यांनी सहकार्य केले. गुरुवारपासून आरोपीचे वकील युक्तिवाद करतील.
युग हत्याकांडातील आरोपीचा अर्ज फेटाळला
By admin | Updated: April 28, 2016 03:06 IST