नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि या जगात धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले. १४ आॅक्टोबर १९५६ ही ती ऐतिहासिक तारीख होती. त्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या ५९ व्या वर्षानिमित्त बुधवारी दीक्षाभूमी बौद्ध अनुयायांनी फुलली होती. हजारो बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केले. बुधवारी सकाळपासूनच बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमीवर गर्दी करायला सुरुवात केली होती.दरवर्षी १४ तारखेला दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. परंतु यंदा ही संख्या अधिक होती. अनुयायांची गर्दी लक्षात घेता स्मारक समितीला पहिल्यांदाच मध्यवर्ती स्मारकाचे चारही दरवाजे उघडावे लागले होते. बौद्ध-आंबेडकरी अनुयायांनी एका रांगेने जाऊन स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाला आणि तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करीत होते. दीक्षाभूमीवर लोकांची ये-जा रात्रीपर्यंत सुरूच होती. (प्रतिनिधी)लोकजागृतीची परंपरा कायम दीक्षाभूमी ही ऊर्जामभूमी म्हणून ओळखली जाते त्यामुळे दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध-आंबेडकरी अनुयायांना जागृत करण्याच्या दृष्टीने अनेक जण आपापल्या पद्धतीने येथे येऊन जागृतीचे काम करीत असतात. दरवर्षीची ही परंपरा आजही कायम आहे. बुधवारीसुद्धा त्याचा प्रत्यय आला. कुणी आपल्या नाटकांद्वारे, तर कुणी गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीचा महिमा सादर करीत जनजागृतीचे काम करीत होते. नागलोकप्रणित समता महिला फाऊंडेशनतर्फे शारदा सोनडवले, हेमलता नंदेश्वर, ज्योती मेश्राम आदींनी पथनाट्य आणि गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीचा महिमा सादर केला. २२ आॅक्टोबरला मुख्य सोहळा दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा २२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा. आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक केंद्रीय व राज्यातील मंत्री हे मुख्य पाहुणे म्हणून निश्चित झाले आहेत. तत्पूर्वी १७ आॅक्टोबर रोजी दीक्षाभूमी परिसरात उभारण्यात आलेल्या नवनिर्मित वातानुकूलित सभागृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. एनसीसी व एसएसडीने सांभाळली व्यवस्था दीक्षाभूमीवर लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) व समता सैनिक दल (एसएसडी)च्या स्वयंसेवकांना सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या सहकार्यासाठी तैनात करण्यात आले होते. त्यांनी योग्यरीत्या आपली जबाबदारी पार पाडली.
तुझेच धम्मचक्र हे, फिरे जगावरी
By admin | Updated: October 15, 2015 03:23 IST