चिचाळा : भरधाव दुचाकी स्लिप हाेऊन गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाहमी शिवारात बुधवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली.
आकाश बुलसिंग पेदाम (२६, रा. दुर्गानगरी, उमरेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश हा आपल्या नवीन विना क्रमांकाच्या दुचाकीने टेकेपार (ता. चिमूर) येथे मामाकडे गेला हाेता. दरम्यान, चिमूर-उमरेडमार्गे ताे घरी येत असताना पाहमी शिवारातील निर्माणाधीन पुलावर त्याचे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यातच दुचाकी स्लिप हाेऊन आकाशला गंभीर दुखापत झाली. त्यास भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान डाॅक्टरांनी त्यास मृत घाेषित केले. याप्रकरणी बादल डुलसिंग पेंदाम (२०, रा. उमरेड) यांच्या तक्रारीवरून भिवापूर पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक भस्मे करीत आहेत.