सक्करदऱ्यातील मोठा ताजबाग दहेलीवाली अम्माच्या दर्गाहजवळ राहणारा हमिद ऑटो चालवून आपल्या परिवाराचा गाडा ओढत होता. त्याला तीन मुले आहेत. छोट्या छोट्या कारणावरून त्याची आई आणि पत्नी आपसात भांडत होत्या. या दोघींची हमिदने अनेकदा समजूत काढली. मात्र, त्या समजून घेण्याऐवजी हमिदवरच आरोप लावत होत्या. त्यांच्या आपसी वादाने हमिदची कोंडी झाली होती. दोघीही ऐकण्याऐवजी हमिदलाच दोष देत असल्याने तो व्यथित झाला होता. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांच्यात असाच वाद झाला होता. दोघीही समजून घेत नसल्याचे पाहून हमिदने त्याच्या ऑटोतून पेट्रोल काढले आणि स्वत:वर ओतून पेटवून घेतले. गंभीर अवस्थेत त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याला डॉक्टरांनी गुरुवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून सक्करदराचे पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
----