मान्यवरांचे मत : ब्रह्मलीन योगी मनोहर यांच्या जीवन चरित्राचे प्रकाशननागपूर : संसारात राहून खडतर प्रसंंगांचा सामना करून अध्यात्माची कास धरण्याचा संदेश ब्रह्मलीन योगीराज मनोहर हरकरे यांनी दिला. त्यामुळे त्यांच्यावरील जीवन चरित्र म्हणजे विलक्षण ग्रंथ होय,असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.वैदिक विश्वयोगी मनोहर ज्ञान प्रसार संस्थेच्या वतीने डॉ. दत्ता हरकरे लिखित ब्रह्मलीन योगी मनोहर उर्फ योगीराज मनोहर हरकरे यांच्या जीवन चरित्राचे प्रकाशन सायंटिफीक सभागृहात करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार गेव्ह आवारी, माजी महापौर कुंदाताई विजयकर, महापालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी महेश गुप्ता, प्रकाशिका ईश्वरी हरकरे, किरण परांजपे, मृणालीनी अपराजित, अरुणा पांडे, हरगोविंद मुरारका, डॉ. ढवळे, महेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गेव्ह आवारी म्हणाले, मी लहानपणापासून योगीराज मनोहर हरकरेंना नेहमी भेटायचो. त्यांना वैदिक विश्वाविषयी प्रश्न विचारत होतो. प्रत्येक वेळी ते माझ्या शंकांचे समाधान करीत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात सुंदर विवेचन आहे. त्यांचे शब्द मनात घर करायचे. अध्यात्मात अनेक अडचणी असून तो काटेरी मार्ग असल्याचे त्यांचे मत होते. वैदिक संस्कृती खूप जुनी असून या संस्कृतीमुळेच भारतीय संस्कृती जगात प्रसिद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कुंदाताई विजयकर म्हणाल्या, योगीराज मनोहर यांनी जीवनातील खडतर प्रसंग पाहिल्यानंतर संसारात राहून अध्यात्माकडे वाटचालीचा संदेश दिला. सर्वात ईश्वराचा अंश असून चांगल्या वाईट प्रकृती आहेत, यापैकी कोणती प्रकृती स्वीकारायची यासाठी गुरुची गरज असल्याचे त्यांचे मत होते. महेश गुप्ता म्हणाले, अध्यात्मात अनुभूतीची गरज असते. योगीराजांच्या ग्रंथातून ही अनुभूती मिळते. जीवनाचे खरे तत्त्व त्यांनी उलगडून दाखविण्याचे कार्य केले. त्यांच्या पुस्तकातून साधना, ध्यान केल्यामुळे आजही प्रसन्न चित्ताने नोकरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. लेखक डॉ. दत्ता हरकरे यांनी योगीराज हरकरे पिता आणि चांगले गुरू असल्याचे सांगून त्यांचे चरित्र लिहिण्याचा आनंद खूप मोठा असल्याचे मत व्यक्त केले. ग्रंथासाठी आर्थिक मदत करणाऱ्या मृणालिनी अपराजित यांचा तसेच मुद्रणासाठी मदत करणाऱ्या महेश काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन सुरेखा जिचकार यांनी केले. (प्रतिनिधी)
योगीराज मनोहर हरकरेंचे जीवन चरित्र विलक्षण ग्रंथ
By admin | Updated: October 7, 2015 03:33 IST