लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांचे आराध्य दैवत आणि विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीगणेश मंदिर टेकडी येथे यंदा कोरोना नियमांमुळे तिळी चतुर्थीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती दि ॲडव्हायझरी सोसायटी ऑफ गणेश मंदिरचे सचिव संजय जोगळेकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
पौष महिन्यात तिळी संक्रांतीच्या काळात येणाऱ्या गणेश चतुर्थीला तिळी चतुर्थी म्हटले जाते. भक्तांमध्ये या तिथीचे विशेष महत्त्व असल्याने गणेश मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी उसळते. श्रीगणेश मंदिर टेकडी येथे या तिथीला यात्रा भरत असते. मात्र, यंदा कोरोना नियमांचे निर्बंध असल्याने आणि प्रशासनाकडून मोठ्या आयोजनास परवानगी नसल्याने तिथी चतुर्थी यात्रा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. असे असले तरी भाविकांसाठी देवस्थानाची दारे उघडी राहणार आहेत. मात्र, भक्तांना मंदिरात प्रवेश करताना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. शिवाय, भक्तांना प्रवेश करताना हार, फुले, प्रसाद आदी कोणतेही विधीविधानाचे साहित्य घेता येणार नाही. आणल्यास हे सर्व साहित्य प्रवेशद्वारावरच व्यवस्थापनातर्फे स्वीकारले जातील आणि भक्तांना केवळ दर्शनासाठी आत सोडण्यात येणार आहे. दूरवरून येणाऱ्या भाविकांना थांबण्याची विशेष व्यवस्थाही येथे करण्यात येणार असल्याची माहिती जोगळेकर यांनी यावेळी दिली. याप्रसंगी अध्यक्ष विकास लिमये, उपाध्यक्ष श्रीराम कुळकर्णी, सहसचिव अरुण व्यास, कोषाध्यक्ष दिलीप शाहाकार उपस्थित होते.
व्हीआयपी पासेसची परंपरा रद्द
देवस्थानात गर्दी होण्याच्या स्थितीत दरवर्षी व्हीआयपी पासेसचे वाटप होत असते. या पासेसद्वारे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना थेट प्रवेश असतो. मात्र, गणपती बाप्पांसाठी सर्व भाविक सारखेच असल्याने, यंदापासून व्हीआयपी पासेसची परंपरा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा जोगळेकर यांनी यावेळी केली. रांगेत लागा आणि दर्शन घ्या, असे सांगतानाच तिळी चतुर्थीला वृद्ध व लहान मुलांनी येणे टाळण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
......