लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कार्यक्रमस्थळी सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून प्रसिद्ध कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन पुरस्कार स्वीकारणार अशी संमती त्यांनी दिली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी पुरस्कार नाकारल्याचा संदेश आयोजकांना पाठविला. यामुळे साहित्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विदर्भ साहित्य संघातर्फे मागील महिन्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. डॉ. मनोहर यांना जीवनव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते; मात्र कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवू नये, अशी मागणी डॉ. मनोहर यांनी केली होती. परंपरेप्रमाणे साहित्य संघातर्फे सरस्वतीची प्रतिमा ठेवण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या डॉ. मनोहर यांनी कार्यक्रमस्थळी येऊन पुरस्कार घेण्यासच नकार दिला. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं. हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही. म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे पत्र डॉ. मनोहर यांनी साहित्य संघाला पाठविले.
मग का स्वीकारला गौरव ?
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेवाळकर कुटुंबीयांच्या विदर्भ साहित्य संघातर्फे पुरस्कारप्राप्त साहित्यिक सत्कारप्रीत्यर्थ कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. मनोहर यांनादेखील सन्मानित करण्यात आले होते. जर त्यांना पुरस्कार नाकारायचाच होता, तर मग तो गौरव का स्वीकारला, असा प्रश्न साहित्य वर्तुळात उपस्थित होत आहे.
त्यांनी तत्त्व पाळावे, आम्ही आमचा कुळाचार पाळू : मनोहर म्हैसाळकर
विदर्भ साहित्य संघाने पुरस्कार जाहीर केला तेव्हा त्यांनी स्वीकारत असल्याचे लेखी कळविले. त्याच अनुषंगाने त्यांनी एक-दोन खासगी सोहळ्यांनाही हजेरी लावली. त्यानंतर सरस्वती प्रतिमा ठेवणार म्हणून पुरस्कार नाकारत असल्याचे त्यांचे कळले. त्यावर जास्त न बोलता त्यांनी त्यांचे तत्त्व जपावे. हा सार्वजनिक सोहळा आहे आणि सरस्वती प्रतिमा ठेवणे ही आमची परंपरा आहे. ती परंपरा कुणामुळे खंडित होणार नाही आणि निरंतर चालणार असल्याचे मत विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी व्यक्त केले.