नागपूर : जगात शांती, अहिंसा व सद्भाव स्थापन व्हावा यासाठी बुद्ध आणि बुद्धांचे विचार स्वीकारण्याची गरज आहे. जगाला याची गरज पटू लागली आहे. त्यामुळे जगभरात बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार गतीने होत आहे, असे प्रतिपादन जपानमधील ताशियो विद्यापीठातील बुद्धिस्ट स्टडीजचे असोसिएट प्रो. डॉ. वेन ग्योदाई कीयुची यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरूअसलेल्या डॉ. नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेचा शनिवारी समारोप झाला. प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. ‘मॉडर्न डे बुद्धिझम अॅण्ड प्रेझेंट डे रिलेवंट’ या विषयावर बोलताना डॉ. कीयुची म्हणाले, जागतिक मंदीच्या काळात जगातील अनेक देशांसोबतच जपानमध्ये सुद्धा अर्थिक मंदी होती. त्या दरम्यान जपानला सावरण्यात बुद्ध तत्त्वज्ञानाचे मोठे योगदान राहिले. जपानच्या अर्थव्यवस्थेत त्याचा प्रभाव आहे. या कारणामुळेच जपानमध्ये मोठ्या संख्येने लोक बुद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत. मागील काही वर्षात जपानमध्ये एका मागोमाग एक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या घटना घडत आहेत. त्याचा सामना करण्यात तेथील बौद्ध भिक्षुंनी कुठलाही स्वार्थ न बाळगता महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच जपान आपत्तींचा सामना मजबुतीने करू शकला. या नि:स्वार्थ सेवाभावाने जगासमोर एक चांगले उदाहरण सादर केले आहे. डॉ. कीयुची यांनी जपानी भाषेत मार्गदर्शन केले. त्याचे हिंदी भाषांतर भदंत संघरत्न माणके यांनी केले. जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. धर्मेश धवनकर यांनी संचालन केले. कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
अहिंसा व शांतीसाठी जगाला बुद्धाची गरज
By admin | Updated: October 25, 2015 03:09 IST