लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झाशी येथून नागपूरला आलेली एक कामगार महिला आपल्या तीन मुलांना घेऊन बिलासपूरला जाण्यासाठी धडपडत होती. प्रवासासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी कशी घ्यावी या विवंचनेत तीन दिवस तिने रेल्वेस्थानकावरच घालवले. रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना ही बाब समजताच ते या महिलेच्या मदतीसाठी धावले. तिच्या भोजनाची, मुलांच्या खाऊची अन् तिकिटाची व्यवस्था रेल्वे चाईल्ड लाईनने केली अन् ही कामगार महिला सुखरूप आपल्या गावी पोहोचली.नागपुरात चार दिवसांपासून अडकलेली महिला, तिचा पती आणि तीन मुले दिल्ली येथे कामानिमित्त गेले होते. ते मूळचे बिलासपूरचे रहिवासी आहेत. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या महिलेचा पती कामानिमित्त बिलासपूरला आला होता. लॉकडाऊन झाल्यामुळे तो गावाकडे अडकला. तिकडे दिल्लीत या महिलेने तीन मुलांना घेऊन काही दिवस काढले. परंतु कामच नसल्यामुळे तिने धावपळ करून श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीने कसेबसे नागपूर गाठले. शनिवारी ही महिला नागपूर रेल्वेस्थानकावर चिंतातुर चेहऱ्याने प्रवाशांना विचारणा करीत होती. तिने रेल्वेस्थानकावरील प्रवाशांना आपबीती सांगितली. बिलासपूरला जाण्यासाठी तिच्याकडे मोजकेच पैसे होते. तिकीट काढण्यासाठी आरक्षण कार्यालयात ही महिला गेली असता बुकिंग क्लर्कने तिला प्रवासासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणण्याची सूचना केली. सोबत तीन मुले होती. याबाबत रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना कळताच ते या महिलेच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी स्टेशन संचालक कार्यालयात या महिलेस पुढील प्रवास करण्यासाठी काही करता येईल काय, याबाबत विचारणा केली. स्टेशन संचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आरपीएफच्या मदतीने पुढील प्रवास करता येणार असल्याचे सांगितले. त्यावर आरपीएफचे अधिकारी, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सकाळी बिलासपूरला जाणाऱ्या गाडीत बसवून देण्याबाबत संमती दिली. त्यामुळे रात्री रेल्वेस्थानकावरच या महिलेने आपल्या मुलांसह मुक्काम केला. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सकाळी आरक्षणाचे तिकीट काढून रेल्वे चाईल्ड लाईनच्या चमूने या महिलेला जाण्याची व्यवस्था केली. महिला आणि तिच्या मुलांसाठी नाश्ता, भोजन मागविले. त्यानंतर रविवारी ०२८०९ हावडा मेलने या महिलेला बिलासपूरला जाण्यासाठी बसवून दिले. यावेळी रेल्वे चाईल्ड लाईनच्या समन्वयिका अंजली शेरेकर, दीपाली धमगाये, रणजित कुंभारे उपस्थित होते. कठीण प्रसंगात मिळालेली मदत पाहून निरोप घेताना या महिलेचे डोळे पाणावले होते.मुलांच्या खाऊची अन् मनोरंजनाची व्यवस्थादरम्यान, या महिला व तिच्या तीन मुलांना मास्क, चप्पल, कपडे, हायजिन किट आणि प्रवासादरम्यान भोजनाची व्यवस्था करण्यात आली. प्रवासात या कामगार महिलेच्या मुलांना कंटाळा येऊ नये यासाठी त्यांना चित्रकलेची वही, रंग, चॉकलेट, बिस्कीट देण्यात आले. चित्रकलेची वही, रंग आणि खाऊ मिळताच त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
अन् ‘ती’ कामगार महिला सुखरूप पोहचली बिलासपूरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:27 IST