- संपादक मंडळ म्हणाले, बुटले आणि ठाकरे यांचे मत तथ्यहीन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वाणिज्य प्रथम वर्षातील ‘शब्दसाधना भाग १’ या मराठी अभ्यास पुस्तिकेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना संत गाडगेबाबा यांचे अनुयायी संबोधण्यात आले आहे. यातून ‘अनुयायी’ हा शब्द वगळण्याची लेखी ग्वाही भाषा अभ्यास मंडळाकडून देण्यात आली आहे. ‘लोकमत’ने या संदर्भात घातलेल्या कटाक्षानंतर हा निर्णय घेतला गेला, हे विशेष.
२०२०-२१च्या सत्रासाठी ‘शब्दसाधना भाग १’ या मराठी अभ्यास पुस्तिकेत ‘समतेचे वारकरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा’ या अशोक राणा यांच्या संशोधनपर पाठात राष्ट्रसंतांना गाडगेबाबांचा अनुयायी संबोधण्यात आले आहे. १७ डिसेंबरच्या ‘लोकमत’च्या अंकात ही बाब प्रसिद्ध झाली होती. त्यावर स्पष्टीकरण देत विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या भाषा अभ्यास मंडळाच्या संपादक मंडळाने या पाठातून ‘अनुयायी’ शब्द वगळण्याची हमी देणारे लेखी पत्र दिले आहे. सोबतच अनुयायी हा शब्द शिष्य या अर्थापुरता संकुचित नसून, एखाद्या विचारधारेचे अनुसरण करणे, या अंगाने या दोन्ही संतांमध्ये समानत्व सिद्ध करणारा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, समाजभावनांचा आदर ठेवत हा शब्द वगळण्यास सामंजस्य भूमिका घेत असल्याचेही सांगण्यात आले आहे. यासोबतच २३ डिसेंबरच्या लोकमतच्या अंकात शब्दसाधनामधील काही पाठ संदर्भरहित असल्याचे आणि प्रस्तुत पुस्तिकेतील ‘मुलाखतलेखन’ हा पाठ व्यावहारिक मराठीला अनुसरून नसल्याचेही भाषा अभ्यास मंडळाच्या लक्षात आणून देण्यात आले होते. मात्र, असा कोणताच नियम नसून अभ्यासपूर्ण लेख घेतल्याने संदर्भ देणे गरजेचे नसल्याचा खुलासा देण्यात आला आहे. शिवाय, ‘मुलाखतलेखन’ या पाठाबाबत भाषा अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले व मराठी विषयाचे अभ्यासक डॉ. कोमल ठाकरे यांनी मांडलेले मत तथ्यहीन असल्याचे संपादक मंडळाने स्पष्ट केले आहे.
* मुख्य विषयाकडे दुर्लक्षच
‘मुलाखतलेखन’ या पाठात लेखन आणि मुलाखत घेण्याच्या तंत्रावर तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले होते. हा पाठ मुलाखत लेखनाचा की मुलाखत घेण्याचा-देण्याचा विषय आहे, हे स्पष्ट होत नसल्याचे मत बुटले व ठाकरे यांनी व्यक्त केले होते. मात्र, त्याचे स्पष्टीकरण तर दूरच उलट त्यांचे मत तथ्यहीन असल्याचे सांगणाऱ्या संपादक मंडळाचे मुख्य विषयाकडे दुर्लक्षच असल्याचे स्पष्ट होत आहे.
......