लिम्बो स्केटिंग : १७ सेंटीमीटर उंच समांतर बारमधून पूर्ण केले २५ मीटरचे अंतरनागपूर : वय केवळ ११ वर्षे ! दिसायला चिमुकली पण आव्हानांना तोंड देण्याची जिद्द तिच्या देहबोलीतून झळकते. उमरेडच्या वेकोलि परिसरात राहणारी सृष्टी शर्मा या बालिकेने लोएस्ट लिम्बो स्केटिंगमध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’साठी बुधवारी यशस्वी प्रयत्न करीत आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.वर्धमाननगरच्या सेंटर पॉर्इंट स्कूल येथील स्केटिंग रिंकवर सृष्टीने १९ सेंटीमीटर उंचीच्या समांतर बारमधून २५ मीटर लांब अंतराचे अवघड आव्हान पूर्ण करताच उपस्थित शेकडो विद्यार्थी आणि गणमान्य नागरिकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. सृष्टीच्या या विक्रमी आणि चमत्कारी कामगिरीचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले तेव्हा वातावरण भावुक झाले होते. ही प्रतिभावान स्केटर इथेच थांबली नाही. काही वेळाच्या अंतराने सृष्टीने आधी १८ व त्यानंतर १७ सेंटीमीटर उंची यशस्वीरीत्या पूर्ण करीत लिम्बो स्केटिंगमध्ये नव्या अध्यायाची नोंद केली.लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडद्वारा सुरू असलेल्या ‘बेटी बचाव’ या आगळ्यावेगळ्या मोहिमेत सेंटर पॉर्इंट स्कूलचे योगदानदेखील मोलाचे ठरले. अपार प्रतिभेची धनी असलेल्या सृष्टीला प्रोत्साहन देणे हा या आयोजनामागील हेतू होता.‘वंडर गर्ल स्केटर’ सृष्टीचा उत्साह वाढविण्यासाठी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा, वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा, सेंटर पॉर्इंट स्कूलचे चेअरमन अरुणदेव उपाध्याय, महावितरणचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे, डॉ. जयसिंग राजवाडे आणि राधिका राजवाडे, सेंटर पॉर्इंट स्कूलच्या कार्यकारी संचालिका मुक्ता चॅटर्जी, प्राचार्या सुमती वेणुगोपालन, वेकोलिचे एरिया नोडल आॅफिसर दिनेश चौरसिया, लोकमत समूहाचे डीजीएम आशीष जैन, लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान आणि लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्रा आदींची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलनानंतर लोकमत समूहाचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. संचालन अनुजा घाडगे यांनी केले. (क्रीडा प्रतिनिधी)असा नोंदविला विक्रम!आत्मविश्वास संचारलेल्या सृष्टीने तिन्ही प्रयत्न यशस्वीरीत्या पूर्ण केले. सर्वप्रथम तिने १९ सेंटीमीटरची उंची पूर्ण करताच मागचा २२.५ सेंटीमीटर उंचीचा रेकॉर्ड मोडीत काढला. त्यानंतर ती १८ सेंटीमीटर उंचीच्या बारमधून २५ मीटर लांब अंतर गाठण्यात यशस्वी झाल्यानंतर १७ सेंटीमीटर उंचीच्या बारमधूनही अलगद बाहेर पडताच शाळेच्या परिसरात उत्साहाला उधाण आले होते. सृष्टीच्या यशाचे व्हीडिओ चित्रण आणि फोटो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहेत. तिचा हा विक्रम प्रमाणित होताच सृष्टीला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र दिले जाईल.सृष्टी वेकोलिची ब्रॅन्ड अॅम्बेसिडर -मिश्रासृष्टीच्या डोळे दीपविणाऱ्या कामगिरीने प्रभावित झालेले वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी आपल्या भाषणात सृष्टीला वेकोलिचे ब्रॅन्ड अॅम्बेसिडर बनविण्याची घोषणा केली. ते म्हणाले,‘सृष्टीने नवा अध्याय लिहिला, हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. सृष्टी आता आमची ब्रॅन्ड अॅम्बेसिडर असेल. तिच्या स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयोजनाचा खर्च वेकोलि परिवार करेल.’’मॅडविन डेव्हाचा विक्रम दुसऱ्यांदा मोडलासृष्टीने आज चेन्नईचा मॅडविन डेव्हा याचा २२.५ सेंटीमीटर उंचीचाआणि २५ मीटर लांब अंतराचा विक्रम दुसऱ्यांदा मोडीत काढून दुहेरी विक्रमी कामगिरी केली. यापूर्वी गेल्यावर्षी २३ आॅगस्टला सृष्टीने लोएस्ट लिम्बो स्केटिंगचा १६.५ सेंटीमीर उंचीचा दहा मीटर अंतराचा विक्रम नोंदविला होता. हा विक्रम डेव्हाच्या नावे होता.
वंडरगर्ल... सृष्टीची विक्रमी झेप
By admin | Updated: October 8, 2015 02:53 IST