नागपूर : धापेवाडासारख्या एका छोट्या गावात काही महिलांनी एकत्र येत बचत गट स्थापन केला. सुरुवातीला लोणचे, पापड विक्री सुरू केली. नंतर त्यांच्यात असलेल्या कौशल्याचा वापर करून कपडे शिवणे सुरू केले. त्या पुरुषांचा शर्ट शिवून विक्री करू लागल्या. त्यांंना सरकारच्या महिला सशक्तीकरण प्रकल्प ‘उमेद’ची साथ मिळली अन् बाजारात विक्रीसाठी धडपड करणाऱ्या या महिलांना ऑनलाइन विक्रीचा मार्ग दाखविण्यात आला. आज या ग्रामीण भागातील महिला प्रसिद्ध शॉपिंग साइटवर आपले शर्ट विकत आहे.
‘उमेद’ या नावाने त्यांनी शर्टची ब्रॅण्डिंग केले आहे. ऑनलाइनवर त्यांचे शर्ट उपलब्ध आहेत. कुठल्याही अनुभवाशिवाय पुरुषांच्या क्षेत्रात या महिलांनी केलेली वाटचाल आणि त्याची मुंबई, दिल्लीत पडलेली छाप वाखाणण्याजोगी आहे. शर्ट बनविणारा हा महिला बचत गट कळमेश्वर तालुक्यातील धापेवाड्यातील गुरुमाऊली स्वयंसहायता बचत गट आहे. या बचत गटाच्या प्रमुख माला कोहाड आहेत. माला कोहाड यांनी २००८ मध्ये बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीला लोणची, पापडांचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाला नाही. त्यामुळे पिशवी शिवायला सुरुवात केली. गटातील सर्व महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले, पण त्यातून त्यांच्या श्रमाला समाधानकारक मोबादला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पुरुषांचे शर्ट शिवायला सुरुवात केली. एका प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या शर्टला प्रतिसादही मिळाला, हीच त्यांच्यासाठी प्रेरणा ठरली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने त्यांच्या प्रेरणेला प्रोत्साहन दिले आणि एका वेगळ्या व्यवसायाला त्यांची सुरुवात झाली. व्यवसायाच्या वाढीसाठी आतापर्यंत या गटाने १५ लाख रुपयांचे बँकेचे कर्ज चुकते केले आहे. मुंबई, दिल्ली येथे झालेल्या प्रदर्शनांमध्ये त्यांनी आपल्या शर्टाची छाप सोडली आहे.
- शिवण्याचा अनुभव होता. त्यातून शर्ट शिवण्याचा प्रयत्न केला. प्रदर्शनामध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. महिला पुरुषांचे वस्त्र शिवतात, हे बघून अनेकांनी दाद दिली. त्यामुळे दोन पैसे अधिक हाती पडले. महिलांचा आत्मविश्वास वाढला. त्यातूनच ही वाटचाल सुरू आहे.
- माला कोहाड, अध्यक्ष, गुरुमाऊली स्वयंसहायता बचत गट