काटाेल : आजाराला कंटाळलेल्या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील झिल्पा शिवारात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्री घडली. चंद्रकला कृष्णाजी खरबडे (६५, रा. झिल्पा, ता. काटाेल) असे मृत महिलेचे नाव आहे. ती काही दिवसांपासून आजारी हाेती, शिवाय तिचे मानसिक संतुलन ढळले हाेते, अशी माहिती तिच्या निकटवर्तीयांनी दिली. शुक्रवारी रात्री घरातील मंडळी झाेपली असताना ती घराबाहेर पडली आणि तिने मिलिंद गुनरकर यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार लक्षात आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार चव्हाण करीत आहेत.
महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST