नागपूर : हे नागपूरचे हिवाळी अधिवेशन आहे. नर्सरीची शाळा नव्हे. त्यामुळे नर्सरीच्या पोरांबद्दल मला प्रश्न विचारू नका, असा खणखणीत टोला लगावत नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
विधानभवन परिसरात पत्रकारांनी आदित्य ठाकरेंच्या १४ दिवसांच्या परफॉर्मंसवर प्रश्न विचारला असता राणे यांनी खोचक टिका केली.यावेळी राणे म्हणाले, संजय राऊत आज इव्हीएम आणि व्हीपॅटवर आक्षेप घेत आहेत. तुमचा नेता साधा ग्रामपंचायत इलेक्शन देखील निवडून येऊ शकत नाही. शिवसेनेचे जेंव्हा १८ खासदार निवडून आले तेव्हा इव्हिएममध्ये दोष नव्हता का. आता मोदींचा हात डोक्यावर निघताच एकही खासदार निवडून येणार नाही, याची धास्ती त्यांना बसली आहे. त्यामुळे एव्हिएमवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच बरोबर खरगे पंतप्रधान पदाचे उमेदवार असावेत, यासाठी आम आदमी पार्टी आणि ममता बॅनर्जींनी समर्थन दिले. पण उद्धव ठाकरे असे समर्थन न देताच महाराष्ट्रात परतले. उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचे डोहाळे तर लागले नाहीत ना असाही टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली.