निशांत वानखेडे
नागपूर : मान्सूनच्या ढगांची व्यापकता संपूर्ण देशात पसरण्यासाठी ८ जुलैची तारीख निश्चित मानली जाते; पण यावर्षी ६ दिवसाआधी मान्सून देशाच्या सर्व भागात पाेहोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले; मात्र विदर्भात मान्सूनच्या आगमनाला १५ दिवसांचा कालावधी लाेटूनही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे विदर्भाचा पावसाचा बॅकलाॅग ४१ टक्क्यांवर गेला आहे. जुलै हा सिझनमध्ये सर्वाधिक पावसाचा महिना मानला जाताे. त्यामुळे या महिन्यात तरी बॅकलाॅग दूर हाेईल, अशी अपेक्षा आहे.
नागपूरसह आसपासच्या जिल्ह्यात जून महिन्यात साधारणत: ३१३.७ मिमी पावसाची नाेंद केली जाते. एखाद्या वर्षी ताे ५५० मिमीच्या वर हाेताे. नागपूरला यावर्षी १ जून ते आतापर्यंत १२८.१मिमी पावसाची नाेंद झाली आहे, जी सरासरी १७०.२ मिमी असते. त्यामुळे पावसाचा बॅकलाॅग ३३ टक्क्यांवर पाेहोचला आहे. सर्वाधिक ५३ टक्के तूट गडचिराेली जिल्ह्यात तर त्याखाली ५० टक्के यवतमाळ जिल्ह्यात आहे. याशिवाय चंद्रपूर ४६ टक्के, भंडारा ४२ टक्के, वर्धा ४७ टक्के आणि अमरावतीत ३८ टक्के कमी पाऊस झाला आहे.
मागील दाेन दिवसांपासून विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. हलक्या प्रमाणात पाऊसही हाेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा आहे; पण दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत गाेंदियात सर्वाधिक ४९ मिमी पावसाची नाेंद झाली. याशिवाय यवतमाळच्या नेरमध्ये २५.९ मिमी पाऊस झाला. नागपूर जिल्ह्यात कुही तालुक्यात सर्वाधिक १८.४ मिमी पाऊस नाेंदविला गेला आहे. वातावरण पाहता हवामान विभागाला अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा असून पुढच्या दाेन दिवसात दमदार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जुलैमध्ये सर्वाधिक २०१३ व सर्वात कमी २०१५ ला
२०१२ पासून दशकभराचा विचार केल्यास नागपुरात २०१३ साली सर्वाधिक ५५०.५ मिमी व २०१८ साली ५४३.५ मिमी पावसाची नाेंद झाली. सर्वात कमी २०१५ साली १०५.२ मिमी पाऊस झाला हाेता. इतिहासात १९९४ साली जुलै महिन्यात सर्वाधिक ६७८.९ मिमी पाऊस नाेंदविला गेला आहे तर २००८ साली सर्वात कमी ८३.२ मिमी पावसाची नाेंद झाली. १२ जुलै १९९४ राेजी ३०४ मिमी पावसाची नाेंद झाली, जी एका दिवसातील सर्वाधिक आहे. १९६६, १९९२ व २०१४ साली सर्वाधिक ४० अंश तापमानाची नाेंद झाली आहे.