नागपूर : नागपूर हे शांत शहर आहे. १९९२ नंतर शहरात कधीच दंगल घडली नाही. त्यामुळे १७ मार्चला नागपुरात घडलेली दंगल दुर्देवी आहे. या दंगलीत अनेकांचे नुकसान झाले असून त्यांना आगामी चार दिवसात त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. परंतु ही नुकसान भरपाई शासन दंगेखोरांची संपत्ती विकून वसूल करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, महसुलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आमदार कृष्णा खोपडे आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून दंगलीचा आढावा घेतला. बैठकीनंतर पोलिस भवनातील ऑडिटोरियममध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर सकाळी जाळल्यानंतर काही जणांनी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल करून घेतले. मात्र, कुराणची आयत लिहिलेची चार जाळल्याचा भ्रम करून सोशल मिडियावर अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे सायंकाळी जमावाने तोडफोड सुरु केली, नागरिकांची वाहने पेटविली. पोलिस आणि नागरिकांवर हल्ला देखिल केला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या, प्रतिबंधात्मक कारवाई व सर्व प्रकारच्या उपाययोजना करून चार ते पाच तासात दंगलीवर नियंत्रण मिळविले. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून आतापर्यंत १०४ जणांना अटक केली आहे. यात ९२ आरोपी आणि १२ विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. आणखी सीसीटीव्ही फुटेज तपासून अखेरच्या दंगलखोराला अटक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर अप्रचार करणारे सहआरोपी
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोशल मीडियावर अपप्रचार केल्यामुळे ही दंगल भडकली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट व्हायरल करून अपप्रचार करणाऱ्यांना सहआरोपी करण्यात येणार आहे. आतापर्यंत असामाजिक तत्वांनी ६८ पोस्ट टाकून त्या डिलीट केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
तपासानंतर कळणार हात कुणाचा, टप्प्याटप्प्याने कर्फ्यु हटविणार
दंगलीत विदेशी, बांगलादेश, मालेगावचा हात असल्याबाबत विचारना केली असता मुख्यमंत्र्यांनी याबाबत आताच बोलणे संयुक्तिक होणार नसल्याचे सांगून तपासानंतर कुणाचा हात आहे, हे समोर येईल, अशी माहिती दिली. शहरातील काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत लावण्यात आलेल्या कर्फ्युमुळे जनजीवन विस्कळीत होऊन शिक्षण, व्यापारावर परिणाम होत आहे. त्यामुळे आजपासून टप्प्याटप्प्याने कर्फ्यु हटविण्यात येईल. परंतु संवेदनशील परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महिला पोलिसावर हल्ला, विनयभंग नाही
दंगलीत महिला पोलिसाचा विनयभंग केल्याच्या बातम्या काही प्रसार माध्यमे व सोशल मीडियावर झळकल्या. परंतु इतर पोलिसांप्रमाणे महिला पोलिसावरही हल्ला करण्यात आला. परंतु त्या महिला पोलिसासोबत अभद्र व्यवहार करण्यात आला नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
काँग्रेसच्या समितीचा सदस्यच दंगेखोर
काँग्रेसने दंगलीबाबत माहिती घेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी समिती गठीत केल्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारना केली असता काँग्रेसच्या समितीतच अकोल्यातील दंगलीचा आरोपी सदस्य आहे. त्यामुळे ही समिती म्हणजे लांगुलचालन करणारी आणि पाय चाटण्याचा प्रकार आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.