ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 14 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन १९ ते २१ मार्चदरम्यान तामिळनाडू येथील कोईम्बतूर येथे करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकांत भाजपाला मिळालेल्या यशानंतर संघ परिवारात उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षभरातील योजनांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रतिनिधी सभेला महत्त्व आले आहे. विजयादशमीच्या सोहळ्यात सरसंघचालकांनी ह्यसंपूर्ण काश्मीरह्णचा नारा दिला होता. तसेच केरळमधील राजकीय हिंसेविरोधात संघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मुद्यांवर प्रतिनिधी सभेत मंथन होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेत सहभागी होतात. शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील कार्यअहवाल मांडतात. यंदाची प्रतिनिधी सभा कोईम्बतूर येथे होत असून प्रथमच तामिळनाडूत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ या दरम्यान सभा होणार असली तरी अगोदर संघटनात्मक पातळीवर बैठका होणार आहेत. भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी सभेला उपस्थित राहतील.समान नागरी कायद्याबाबत संघाचा आग्रह, सामाजिक समरसतेची मोहीम, केरळ-काश्मीरबाबतची संघाची दृष्टी, इत्यादी मुद्यांवर या सभेदरम्यान चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत समाविष्ट होणारे मुद्दे अंतिम झाले असून संघ परिवाराशी जुळलेल्या संस्थांमध्ये समन्वय वाढावा याकरिता मंथन होणार आहे. संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.या सभेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे, तो संघाचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात. अशा ठिकाणी केंदद्र शासनाने जास्तीत जास्त लक्ष द्यावे असा प्रतिनिधींचा सूर आहे.नव्या गणवेशातील पहिलीच सभा२०१६ रोजी नागौर येथे झालेल्या प्रतिनिधी सभेत संघाच्या गणवेशात बदल करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. नव्या गणवेशातील कोईम्बतूर येथील ही पहिलीच सभा राहणार आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्यासह सर्वच मोठे पदाधिकारी सहभागी होतील. गोव्यातील बंडावर मंथन?या प्रतिनिधी सभेत नेमके कुठले प्रस्ताव मांडले जाणार हे संघाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र २०१६ मध्ये गोव्यातील तत्कालीन संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या बंडामुळे संघाला मोठा धक्का बसला होता. वरिष्ठ पातळीवर याची चर्चादेखील झाली होती. संबंधित बंडावर या प्रतिनिधी सभेत चर्चा होणार का, यावर संघ पदाधिकाऱ्यांनी मौन साधले आहे.
केरळ, काश्मीरवर होणार संघमंथन?
By admin | Updated: March 14, 2017 22:15 IST