कळमन्यातील घटना : सासऱ्यावरही केला होता हल्लानागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनापूर येथे तत्काळ भूखंडाच्या मालकीची कागदपत्रे न दिल्याने पत्नीवर चाकू आणि कुदळने हल्ला करून ठार मारणाऱ्या तसेच सासऱ्यावरही हल्ला करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अमित ऊर्फ पप्पू रामाजी दूधबावरे (३१) असे आरोपीचे नाव आहे. सुनीता अमित दूधबावरे (२६), असे मृत महिलेचे नाव होते. रामू आत्माराम भोयर (६५) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. अमित दूधबावरे हा अजनी चुनाभट्टी येथील मूळ रहिवासी आहे. त्याचे सासरे रामू भोयर हे पुनापूर येथील महादेव हजारे यांच्या शेतात झोपडी उभारून आपल्या पत्नीसोबत राहतात. ते गवंडी काम करतात. अमित हा देखील पत्नी आणि दोन मुलांना घेऊन आपल्या सासऱ्याच्या घरी राहण्यास आला होता. १८ डिसेंबर २०११ रोजी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास अमित हा दारूच्या नशेत घरी आला होता. त्याने पत्नीला भूखंडाच्या मालकीचे कागदपत्र मागितले होते. तिने सकाळी कागदपत्र देते, आता देऊ शकत नाही असे म्हणताच त्याने चिडून शिवीगाळ करीत सुनीताला मारहाण सुरू केली होती. वृद्ध रामू भोयर हे आपल्या मुलीला वाचविण्यास धावले असता अमितने त्यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले होते. त्यामुळे त्यांनी आॅटोरिक्षातून कळमना पोलीस ठाणे गाठून तक्रार केली होती. त्याचवेळी अमितने पत्नीवर आधी चाकूने आणि नंतर कुदळीने वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले होते. त्याने एकूण १७ घाव घातले होते. रक्तबंबाळ अवस्थेतच त्याने पत्नीला मेयो इस्पितळात नेले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. कळमना पोलिसांनी रामू भोयर यांच्या तक्रारीवर भादंविच्या ३०२, ३०७, ३२४, शस्त्र कायद्याच्या ४/२५ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. उपनिरीक्षक बी. के. मरापे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात १४ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपी अमित दूधबावरेला भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, ३२४ कलमांतर्गत एक वर्ष कारावास, एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत भांडेकर यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)
पत्नीच्या खुनात पतीला जन्मठेप
By admin | Updated: December 14, 2015 03:15 IST