देवलापार : भरधाव बाेलेराेने माेटरसायकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील बांद्रा शिवारात शनिवारी (दि. ९) दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास घडली.
मालन गाैरीशंकर शरणागत (५०) असे मृत पत्नीचे तर गाैरीशंकर माेहन शरणागत (५५) असे जखमी पतीचे नाव आहे. ते नागपूर शहरातील रहिवासी असून, एमएच-३१/इएक्स-०४६४ क्रमांकाच्या माेटरसायकलने कुरईहून देवलापार मार्गे नागपूरला जात हाेते. गाैरीशंकर माेटरसायकल चालवित हाेते तर मालन मागे बसल्या हाेत्या. दरम्यान, बांद्रा शिवारात मागून वेगात येणाऱ्या एमपी-५०/बीसी-०२२४ क्रमांकाच्या बाेलेराेने त्यांच्या माेटरसायकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात दाेघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेघांनाही देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी मालन यांना तपासणीअंती मृत घाेषित केले तर गाैरीशंकर यांच्यावर प्रथमाेपचार करून त्यांना उपचारासाठी नागपूरला रवाना केले. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी बाेलेराे चालकाविरुद्ध भादंवि२७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड करीत आहेत.