कॅशलेस रिझर्व्हेशन : पहिल्या टप्प्यात १०० बसेसमध्ये वायफाय नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या बसेसमध्ये सोमवारपासून प्रवाशांना नि:शुल्क वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशाला डिजिटल करण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आले आहे. याबाबत गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात एसटी बसेसमध्ये वायफायची सुविधा सुरू करण्याचा शुभारंभ नागपुरातून करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात गणेशपेठ आगारातील १०० बसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर इतर आगाराच्या बसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बसेसमध्ये वायफाय उपलब्ध करून देण्याचे काम एका आठवड्यात पूर्ण होणार आहे. नागपुरातून औरंगाबाद, पुणे, नांदेड, अमरावती, वर्धा, अकोला, पचमढी, हैदराबादसह इतर ठिकाणांसाठी जाणाऱ्या सर्व बसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध राहील. (प्रतिनिधी) कॅशलेसवर भर गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी सांगितले की, कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी रिझर्व्हेशन काऊंटरवर दोन स्वाईप मशीन लावण्यात आल्या आहेत. येथे प्रवासी एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बसचे आरक्षण करू शकतात. कंडक्टरजवळही राहील स्वाईप मशीन कॅशलेस व्यवहारासाठी लवकरच कंडक्टरजवळही स्वाईप मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रियाही लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एसटी बसेसमध्ये सोमवारपासून वायफायची सुविधा
By admin | Updated: February 4, 2017 02:55 IST