शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

का लागतात इस्पितळांमध्ये आगी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:07 IST

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये दहा नवजात बालकांचा जीव घेणारी आग नेमकी ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये दहा नवजात बालकांचा जीव घेणारी आग नेमकी लागली तरी कशी, हा सवाल अनुत्तरितच आहे. आजवर देशभरात अनेक इस्पितळांत आगी लागल्या व शेकडो रुग्णांनी जीव गमाविला. मात्र, तरी देखील प्रशासकीय यंत्रणा व इस्पितळ प्रशासनांना जाग आलेली नाही. अग्निशमन यंत्रणेकडून वारंवार इशारा दिल्यानंतरही इस्पितळांकडून नियमावलीचे पालन करण्यात येत नाही व त्याची परिणती जीवघेण्या आगीमध्ये होते. मागील पाच वर्षांत देशभरामध्ये १८ हून अधिक इस्पितळांत आगी लागल्या व १० वर्षांत तर शेकडो रुग्णांचे अशा आगींमध्ये बळी गेले. तरीदेखील इस्पितळांमध्ये आगी कशा लागतात, हा प्रश्न कायम आहे.

इस्पितळांकडून नियमांचे पालनच नाही

इस्पितळांना दर सहा महिन्यांनी ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करणे अत्यावश्यक असते. यासंदर्भात सरकारने कायदा बनविला आहे. मात्र, नियमितपणे हे ‘ऑडिट’ होतच नाही. त्यासाठी इस्पितळांकडून पुढाकार घेण्यात येत नाही. अनेक इस्पितळे तर लहान जागेत असतात व तेथे ‘फायर एक्झिट’ची सोय नसते. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक यंत्रणेची कमतरता दिसून येते. बऱ्याच इस्पितळांत तर आग विझविण्याचे साधे यंत्रदेखील अडगळीत पडलेले असते.

‘आयसीयू’त विशेष काळजी नाही

‘आयसीयू’मध्ये प्राणवायूचे सिलिंडर्स असतात. आग लागल्यानंतर ऑक्सिजनमुळे आग लवकर पसरते. ‘एसी’जवळ ही सिलिंडर्स ठेवणे टाळले पाहिजे. वीज उपकरणांवर व वायरिंगवर धूळ साचणे, गंज चढणे यातूनही आगीचा धोका संभवतो. त्यामुळे त्यांची स्वच्छता नियमितपणे झाली पाहिजे. मात्र, यासंदर्भात विशेष काळजी घेण्यात येत नाही.

कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षणाची कमतरता

आग लागल्यानंतर आपत्कालीन स्थिती कशी हाताळायची, याचे इस्पितळातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, खर्च वाचविण्यासाठी इस्पितळांकडून अशा प्रशिक्षणाची कागदोपत्रीच पूर्तता होते. ‘फायर सेफ्टी एक्झिट’ची देखील त्यांना माहिती नसते. त्यामुळे आग लागल्यानंतर ते गोंधळतात व आगीमुळे जीवितहानीचा धोका आणखी वाढतो.

अत्याधुनिक वीज यंत्रणेचा उपयोग नाही

तंत्रज्ञान प्रगत झाले असून ‘शॉर्टसर्किट’ झाल्यावर लगेच वीज बंद होते व अलार्मदेखील वाजतो. मात्र, अनेक इस्पितळांकडून अत्याधुनिक वीज यंत्रणेचा उपयोग टाळण्यात येतो. यंत्रांचा वापर वाढत असताना विजेचे पॅनल्स व वायरिंगला बदलण्याकडे लक्ष दिले जात नाही.

‘सेफ्टी ऑडिट’ करणे आवश्यकच

इस्पितळांमध्ये ‘फायर फायटिंग’प्रणालीवर जास्त भर दिला गेला पाहिजे. इस्पितळांमध्ये विविध यंत्र असतात. त्यांचे नियमितपणे मेन्टेनन्स होतच नाही. शिवाय फायर ‘सेफ्टी ऑडिट’कडेदेखील अनेकदा दुर्लक्ष होते. त्यातूनच बऱ्याचदा शॉर्टसर्किट किंवा इतर तांत्रिक त्रुटीमुळे अचानक आगीचे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी नियमित ‘सेफ्टी ऑडिट’ झालेच पाहिजे.

- रमेश कुमार, संचालक, नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर

मागील दहा वर्षांत इस्पितळांत लागलेल्या जीवघेण्या आगीच्या मोठ्या घटना

९ मे २०११ : बीड, महाराष्ट्र : दोन नवजात बालकांचा मृत्यू

२३ जुलै २०११ : किलपौक इस्पितळ, चेन्नई (तमिळनाडू) : दोघांचा मृत्यू

९ डिसेंबर २०११ : एएमआरआय इस्पितळ, कोलकाता : ९५ जणांचा मृत्यू

८ सप्टेंबर २०१२ : के. एम. मेमोरिअल हॉस्पिटल, बोकारो (झारखंड) : तिघांचा मृत्यू

२७ ऑगस्ट २०१६ : मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज (पश्चिम बंगाल) : आग व चेंगराचेंगरीत ३ जणांचा मृत्यू

१७ ऑक्टोबर २०१६ : आयएमएस-एसयूएम इस्पितळ, भुवनेश्वर : आगीच्या धुराने गुदमरून २२ रुग्णांचा मृत्यू झाला व १२० जखमी

१७ ऑक्टोबर २०१७ : रोहिणी सुपर स्पेशालिटी इस्पितळ, हनामकोंडा (तेलंगणा) : दोन रुग्णांचा मृत्यू व चार जण जखमी

४ नोव्हेंबर २०१७ : एमवाय हॉस्पिटल, इंदोर (मध्य प्रदेश) : ४७ नवजात बालकांचा जीव धोक्यात आला होता.

२८ मे २०१७ : पंजाबराव देशमुख इस्पितळ, अमरावती (महाराष्ट्र) : ४ नवजात बालकांचा मृत्यू

१६ जुलै २०१७ : किंग जॉर्ज इस्पितळ, लखनौ (उत्तर प्रदेश) : ‘ट्रॉमा सेंटर’मध्ये लागलेल्या आगीमध्ये १३ जणांचा मृत्यू

१५ जानेवारी २०१८ : साई इस्पितळ, बरेली (उत्तर प्रदेश) : ‘आयसीयू’मध्ये लागलेल्या आगीत २ रुग्णांचा मृत्यू

१७ डिसेंबर २०१८ : ईएसआयसी इस्पितळ, मरोळ, मुंबई (महाराष्ट्र) : ११ जणांचा मृत्यू

१३ मार्च २०१९ : मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज (पश्चिम बंगाल) : आग व चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू, ३० जण जखमी

२२ एप्रिल २०१९ : जिल्हा महिला इस्पितळ : एका नवजात बालकाचा मृत्यू

२७ नोव्हेंबर २०२० : उदय सिवानंद इस्पितळ, राजकोट (गुजरात) : ‘आयसीयू’मध्ये लागलेल्या आगीमध्ये पाच रुग्णांचा मृत्यू

६ ऑगस्ट २०२० : श्रेया इस्पितळ, अहमदाबाद (गुजरात) : ‘आयसीयू’मध्ये लागलेल्या आगीत ‘कोरोना’च्या आठ रुग्णांचा मृत्यू

९ ऑगस्ट २०२० : कोरोना इस्पितळ, विजयवाडा, आंध्र प्रदेश : ‘कोरोना’ रुग्णांसाठी तात्पुरत्या स्वरूपातील इस्पितळात आग लागल्याने १० रुग्णांचा मृत्यू

३० सप्टेंबर २०२० : शिवपुरी जिल्हा इस्पितळ (मध्य प्रदेश) : ‘आयसीयू’मध्ये आग लागल्याने एका रुग्णाचा मृत्यू

१२ ऑक्टोबर २०२० : अपेक्स इस्पितळ, मुंबई (महाराष्ट्र) : दोघांचा मृत्यू