नागपूर : प्रतापनगर सिमेंट रस्त्याकडून मणी ले-आऊटकडे जाणाऱ्या वळणावर पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर केवळ माती टाकून संबंधित खड्डे बुजविण्यात आले. नियमाप्रमाणे संबंधित जागेचे कॉंक्रिटीकरण करणे आवश्यक होते. मात्र यासंदर्भात अद्यापही प्रशासनाने पुढाकार घेतलेला नसून मातीवरून घसरून अपघात होण्याचा धोका असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
मनीष ले-आऊटमध्ये डुकरांचा सुळसुळाट
नागपूर : भेंडे ले आऊटजवळील मनीष ले-आऊट परिसरात मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. सोबतच संबंधित भागात डुकरांचे प्रमाणदेखील वाढले आहे. या ठिकाणी नियमित स्वच्छता व्हावी व कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
रात्रीच्या कोंडीला जबाबदार कोण?
नागपूर : एरवी दिवसभर रहदारी असलेल्या लक्ष्मीनगर चौकात रात्रीदेखील वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. नियमांना धाब्यावर बसवून चौकातील एक ‘कॉफी शॉप’ रात्री उशिरापर्यंत चालू असते. तेथे येणारे लोक मनमर्जीप्रमाणे रस्त्यांवर वाहने लावतात. त्यामुळे नाहक वाहतुकीची कोंडी होते. आश्चर्याची बाब म्हणजे बजाजनगर पोलीस ठाण्याला याची माहिती असूनदेखील कुठलीही कारवाई करण्यात येत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.