नागपूर : नैसर्गिक आपत्ती आली, दंगल झाली किंवा अन्य अशाच घटनांमध्ये कुणी दगावला, जखमी झाला तर त्याला शासकीय मदत मिळते. कुणी कुणावर हल्ला केला, जखमी केले तर मारणाऱ्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल होतो, त्याला अटक केली जाते. मात्र, गेल्या ४८ तासात अनेक निरपराध जबर जखमी झाले. कित्येक जण केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावले. परंतु, ना त्यांना कोणती मदत मिळाली ना जखमी करणाऱ्या आरोपीवर कुण्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला.ज्यांना जखमा झाल्या ते विव्हळत आहेत. त्यांचे नातेवाईक उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. आताही कापाकापी सुरूच आहे. मात्र, पतंगबाजीच्या गुन्हेगारांना आवरण्यास कुणी तयार नाही. संबंधित यंत्रणा तोंडावर बोट ठेवून बसली आहे.मकरसंक्रांतीचा सण आला की पतंगबाजीचा उन्माद सुरू होतो. विविध रसायनाचा वापर करून निर्माण करण्यात आलेल्या घातक मांजाची मागणी अचानक वाढते. या मांजामुळे पतंगाचीच नव्हे तर अनेकांच्या जीवनाचीही दोर कापली जाते. जखमींना कोण करणार मदत ?नागपूर : कित्येकांना जीवघेण्या जखमा होतात. गेल्या चार पाच वर्षांपासून हे सुरू आहे. त्यामुळेच या मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्याची जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिक करतात. पोलीसही मांज्या विक्रीवर बंदी घालतात. त्यानंतर संबंधित व्यापारी ती उठविण्यासाठी कोर्टात धाव घेतात. खरे म्हणजे, व्यापाऱ्यांनी आपला गल्ला भरताना आपला धंदा कुणाच्या जीवावर उठणार नाही, याचा विचार करायला हवा. मात्र, नायलॉन मांजा विकणारे हा विचार करीत नाही अन् निरपराध व्यक्ती/ मुलांचा जीव जातो. त्याच्या कुटुंबीयांच्या मनावर कायमचे ओरबडे उठतात. जखमी झालेल्या निरपराध व्यक्ती / मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वाट्याला विनाकारण रुग्णालयाचे हेलपाटे अन् खर्चासोबत मनस्ताप येतो. त्यांचा आक्रोश लक्षात घेता यंदा पोलिसांनी नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी घातल्याची घोषणा केली होती. शहराचे सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी ७ जानेवारीला फौजदारी प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ अन्वये एक आदेश प्रसारित केला. त्यानुसार, ८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविताना कुणी आढळल्यास त्याच्यावर भादंविच्या १८८ अन्वये कारवाई करण्याचा इशारा दिला. सहपोलीस आयुक्तांच्या या आदेशामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळाला. अनेकांनी मनोमन सहआयुक्तांना धन्यवादही दिले. मात्र, या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही. कारण, १४, १५ आणि १६ जानेवारीला हजारो पतंगबाजांनी नायलॉनचा मांजा वापरून पतंग उडविली.अनेकांना जीवघेण्या दुखापती झाल्या. मेयो, मेडिकल, डागा आदी शासकीय रुग्णालयासोबतच शहरातील अनेक खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात जखमी व्यक्ती भरती झाल्या. अनेक पक्षी तडफडत गतप्राण झाले. मात्र, नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्या दोषी पतंगबाजावर कडक कारवाई झाली नाही. (प्रतिनिधी)सहपोलीस आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष का ?पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करताना आढळून येणाऱ्या संबंधित नागरिकांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारावजा आदेश सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांनी ७ जानेवारी रोजी दिला होता. मात्र खुद्द पोलिसांकडून या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणीच झाली नसल्याचे दिसते. लोकसेवक हा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ अन्वये, असा आदेश जारी करतो. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध भादंविच्या १८८ कलमान्वये कारवाई केली जाते. आदेशाच्या उल्लंघनासाठी एक महिन्याचा साधा कारावास आणि २०० रुपये दंडाची शिक्षा आहे. या आदेशाच्या उल्लंघनाबरोबर मानवी, जीवित, आरोग्य किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यास संबंधितास सहा महिन्यांचा साधा कारावास आणि एक हजार रुपये दंडाचे प्रावधान आहे. १ एप्रिल १९७४ पासून या कलमांतर्गतच्या अपराधाला दखलपात्र करण्यात आले आहे. हा अपराध जामीनपात्र असून विना समझोत्याचा आहे. या अपराधांतर्गतचा खटला केवळ प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात चालतो.
पतंगबाजीच्या गुन्हेगारांना शिक्षा कोण करणार?
By admin | Updated: January 17, 2015 02:35 IST