नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘एलएलडी’ (डॉक्टर ऑफ लॉ) ही मानद पदवी प्रदान करण्यासाठी ३ एप्रिलची तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र सरन्यायाधीशांना ही पदवी प्रदान करणार कोण याबाबत अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती कार्यालयाकडून वेळ मिळू शकलेली नाही. त्यामुळे माजी राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींना निमंत्रित करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
सरन्यायाधीश बोबडे यांचे शिक्षण नागपूर विद्यापीठातच झाले. त्यांच्यामुळे नागपूर व विदर्भाची मान उंचावली गेली आहे. विधी क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांना मानद पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याकडून ३ एप्रिल ही तारीख देण्यात आली असून, त्याच दिवशी विशेष दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. विधिसभेनेदेखील या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. सरन्यायाधीशांच्या पदाची उंची लक्षात घेता त्यादृष्टीने प्रमुख पाहुणे आमंत्रित होणे अपेक्षित आहे. या समारंभासाठी राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यासाठी पत्रदेखील पाठविण्यात आले होते. परंतु राष्ट्रपती कार्यालयाकडून वेळ देण्यात आली नाही. त्यामुळे आता कुणाला निमंत्रित करावे, हा विद्यापीठासमोर प्रश्न उभा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील किंवा विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना निमंत्रित करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कोरोनाचा बसणार फटका
नागपूरसह विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून सध्या लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊन संपविण्यात येईल की नाही याबाबत शाश्वती नाही. अशा स्थितीत प्रत्यक्ष आयोजन होणे कठीण असल्याचा विद्यापीठात सूर आहे. त्यामुळे ऑनलाईन आयोजन करण्यासंदर्भात विद्यापीठाचा विचार सुरू आहे.