नागपुरातील कुख्यात गौरव तुलीच्या मुसक्या कोण बांधणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:27 PM2020-03-16T23:27:30+5:302020-03-16T23:28:10+5:30

अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला कुख्यात गौरव तुली याच्यावर पोलीस कडक कारवाई का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Who will arrest the notorious Gaurav Tuli in Nagpur? | नागपुरातील कुख्यात गौरव तुलीच्या मुसक्या कोण बांधणार?

नागपुरातील कुख्यात गौरव तुलीच्या मुसक्या कोण बांधणार?

googlenewsNext
ठळक मुद्देसोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला जबर मारहाण : सर्वत्र दहशत, अनेक गुन्हे दाखल : गंभीर कारवाई मात्र होत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला कुख्यात गौरव तुली याच्यावर पोलीस कडक कारवाई का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेकांना मारहाण करून दहशत निर्माण करणारा गौरव गुन्हा केल्यानंतर पोलिसांना सापडत नाही. मात्र तो जामीन मिळविण्यासाठी शहरातच बिनबोभाट फिरत असल्याने पोलीस त्याला पकडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात की केवळ त्याला शोधण्याचा फार्स करतात, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
कुख्यात गौरवविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जमिनीच्या वादग्रस्त व्यवहारात तो जिकडून फायदा मिळेल तिकडून कुदतो. गेल्या वर्षी सीपी क्लबमध्ये त्याने एका प्रतिष्ठित व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला चढवला होता. डोक्यावर बीअरची बॉटलही फोडली होती. या प्रकरणामुळे उपराजधानीतील व्यावसायिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. पोलिसांवर गौरवला वाचविण्याचा आरोपही झाला होता. गौरवने या प्रकरणात पोलिसांना पद्धतशीर हाताळून स्वत:वर कडक कारवाई होणार नाही, याची काळजी घेतली. हे प्रकरण निपटल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सदनिकेच्या कब्जा प्रकरणात त्याने संबंध नसताना उडी घेतली होती. लाखोंच्या या व्यवहारात त्याने गैरअर्जदारांकडून आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रकरण सदर पोलीस ठाण्यात पोहचले होते. मात्र, त्याही वेळेला तक्रारकर्त्यांवर आपल्या साथीदारांच्या माध्यमातून पद्धतशीर दडपण आणून त्याने पोलीस कारवाईपासून स्वत:चा आणि साथीदारांचा बचाव केला होता. या प्रकरणाची चर्चा ताजीच असताना गौरवने क्षुल्लक कारणावरून १७ फेब्रुवारी २०२० ला एका लग्नसमारंभात गोंधळ घातला होता. बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यासोबत त्याने वाद घालून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. तेथे अनेकांनी त्याला अडवले. त्यानंतर संबंधित व्यक्ती रामदासपेठमधील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये आले. गौरवला हे माहीत होताच रात्री ९.४५ च्या सुमारास तो, त्याचे सासरे, वाहनचालक आणि बलजित जुनेजा तसेच गुरुप्रीत जुनेजासह हॉटेलमध्ये पोहचला. त्याने हॉटेलमध्ये विना परवानगी शिरून आरडाओरड तसेच शिवीगाळ सुरू केली.
ती ऐकून अंगद आणि अर्जुन अरोरा त्याची समजूत काढण्यासाठी आले असता, आरोपी गौरव तुली आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी तोडली आणि अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात सुधीर तुपोने यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे, नुकसान करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे आदी आरोपावरून गौरव आणि साथीदारांविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला. मात्र, गौरवला अटक करण्याची तत्परता पोलीस दाखवू शकले नाही. त्याने त्यात अटकपूर्व जामीन मिळवला. या प्रकरणाला एक महिना होत नाही तोच पुन्हा गौरवने चार दिवसांपूर्वी सदरमधील ज्या भागात तो राहतो, त्या सोसायटीत प्रचंड हैदोस घातला. सोसायटीत त्याने स्वत:च्या वाहनासाठी ग्रीन नेट टाकून जागा व्यापली. त्यामुळे सोसायटीतील मंडळींनी त्याला आक्षेप घेतला. जाण्या-येण्याला अडसर निर्माण होत नसल्यामुळे सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे विनय चतुर्वेदी त्याच्याकडे गेले. त्यांनी आरोपी गौरवला ग्रीन नेटचे शेड काढण्यास सांगितले असता, त्याने विनय यांना अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. जीवे मारण्याचीही धमकी दिली. लाकडी दांड्याने जोरदार मारहाण झाल्याने विनय चतुर्वेदी जबर जखमी झाले असून, ते जीवाच्या धाकामुळे प्रचंड दहशतीत आले आहेत. उपचार करून घेल्यानंतर त्यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी आरोपी गौरवविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हापासून गौरव फरार आहे.

आता तरी होईल का अटक?
सदर पोलीस गौरवचा ठिकठिकाणी शोध घेत आहेत. त्याच्याबाबत कसलीही माहिती असेल तर आम्हाला कळवा. गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असे सदरचे ठाणेदार महेश बनसोडे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात गौरवला अटक करण्यात पोलिसांना यश मिळेल की तो नेहमीप्रमाणे पोलिसांना हुलकावणी देऊन पुन्हा अटकपूर्व जामीन मिळवणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Who will arrest the notorious Gaurav Tuli in Nagpur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.