शंकरबाबा पापळकर यांचा संतप्त सवालनागपूर : देशातील सुमारे पाच कोटी विकलांगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘अच्छे दिन’अजून कोसो दूर आहेत. यावेळच्या मोदी सरकारच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात या घटकासाठी काहीही तरतूद करण्यात आली नाही, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली आहे. पापळकर यांनी आजवर अनेक अपंग व मतिमंदांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा न्यायालयीन लढासुद्धा दिला आहे.‘लोकमत’शी बोलताना शंकरबाबा म्हणाले, देशात दरवर्षी एक लाख विकलांग बेवारस दिसतात. त्यांचा ठावठिकाणा नाही. एकट्या महाराष्ट्रात पाच लाख मतिमंद असून १० हजारावर बेवारस आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही. देशातील या दुर्लक्षित घटकासाठी दरवर्षी अर्थसंकल्पीय तरतूद झाली पाहिजे. किमान १० हजार कोटी रु. त्यांच्यासाठी राखून ठेवले पाहिजे. मानसिक विकलांगांसाठी सिकंदराबाद येथे एक मोठे केंद्र आहे; त्या धर्तीवरच बेवारस मतिमंदांचेही पुनर्वसन झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.देशात व राज्यात मोठमोठ्या स्वयंसेवी सामाजिक संस्था आहेत, पण त्यांना या दुर्लक्षित घटकाकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा शब्दात संताप व्यक्त करून शंकरबाबा म्हणाले, सरकारकडून अनुदान लाटणाऱ्या या संस्थांची सरकारविरुध्द आवाज उठविण्याची मानसिकता नाही.बेवारस अपंग व मतिमंदांसाठी योजना आखण्यात सरकार खरेच प्रामाणिक असेल तर या कामी सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. (प्रतिनिधी)
अपंग, मतिमंदांचा वाली कोण?
By admin | Updated: July 16, 2014 01:13 IST