प्रियंका शुक्ला-ओसवालचे यश : विद्यापीठात सर्वाधिक १२ पदकांची मानकरीनागपूर : मोठ्या संस्थेतून घेतलेले अभियांत्रिकीचे शिक्षण अन् त्यादरम्यानच ‘इस्रो’सोबत काम करायची मिळालेली संधी. परंतु प्रवाहाविरुद्ध जात गलेलठ्ठ ‘पॅकेज’ला नाकारत भारतीय संविधानाचा जवळून अभ्यास करण्यासाठी त्यांनी चक्क विधी शाखेत प्रवेश घेतला. इतके करून समाधान मानले नाही तर अहोरात्र मेहनत करीत विधी शाखेत ‘टॉप’ येण्याचा मानदेखील मिळवला. ही यशोगाथा आहे अॅड. प्रियंका पीयूष शुक्ला-ओसवाल यांची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०१ व्या दीक्षांत समारंभात सर्वात अधिक १२ पदकांनी सन्मान स्वीकारण्याचा मान त्यांना मिळणार आहे. प्रियंकाने बेंगळुरू येथून ‘इलेक्ट्रॉनिक अॅन्ड टेलिकम्युनिकेशन’ मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली. याचदरम्यान ‘इस्रो’सोबत एका प्रकल्पावर काम करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली. परंतु मनात भारतीय संविधान अन् कायदेप्रणाली जाणून घेण्याची इच्छा होती. यातूनच त्यांनी २०११ साली नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबडकर विधी महाविद्यालयात ‘एलएलबी’च्या तीन वर्षीय अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.घरचे वातावरण जरी वकिलीचे असले तरी अभ्यासाच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम नवीनच होता. परंतु बेसिक पक्के करीत एकाग्रतेने अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला व त्यातूनच नेत्रदीपक यश मिळविले.२०१३-१४ या वर्षासाठी त्यांचा १०१ व्या दीक्षांत समारंभात सर्वाधिक पदके देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यात सात सुवर्ण तर चार रौप्यपदकांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)वंचितांची सेवा करण्याची संधीअभियांत्रिकी करीत असताना मला कायदा जाणून घेण्याची इच्छा होती. लग्न झाल्यानंतर माझे पती, सासरे तसेच मित्रपरिवारातील अनेक जण वकील होते. त्यामुळे विधी क्षेत्राबद्दल माझी रुची आणखी वाढली, शिवाय घरूनदेखील प्रोत्साहन मिळाले. सुरुवातीला अडचणी आल्या, पण शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. वकिलीच्या माध्यमातून समाजातील वंचित व अन्यायग्रस्त लोकांना न्याय देण्याची संधी मिळते. ही एकप्रकारे समाजसेवाच आहे असे मी मानते, असे प्रतिपादन प्रियंका शुक्ला-ओसवाल यांनी केले.
जेथे इच्छा तेथे मार्ग
By admin | Updated: February 3, 2015 00:59 IST