कैलास निघाेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : प्रादेशिक वन विभागाच्या माेगरकसा (तालुका रामटेक) या संरक्षित जंगलातील सागवान तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आराेपींनी ट्रॅक्टरच्या नऊ ट्राॅली सागवान लाकूड चाेरून नेल्याची कबुली दिली. वन अधिकाऱ्यांनी यातील एक ट्राॅली म्हणजे २७ नग सागवान जप्त केले. ते सागवान लाकूड माेगरकसा जंगलातील असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले. उर्वरित आठ ट्राॅली सागवान त्यांनी कुठून चाेरून नेले आणि कुठे विकले, या तस्करीत आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास करताना वन अधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. ही सागवान तस्कर वन कर्मचाऱ्याच्या संगनमताशिवाय शक्य नाही. त्यामुळे तो वन कर्मचारी नेमका काेण आहे, हेदेखील शाेधून काढणे आवश्यक आहे.
या प्रकरणात चिंतामण हरी मेहेर, पंकज बबन साेनवाने, सुधाकर मसराम, सुधाकर काेेकाेडे व अविनाश मरकाम या पाच जणांना अटक करण्यात आली असून, वन अधिकाऱ्यांनी त्यांची पुन्हा दाेन दिवसांची वन काेठडी मिळवली आहे. या काळात आराेपींनी बरीच महत्त्वाची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली. आपण आजवर ट्रॅक्टरच्या नऊ ट्राॅली सागवान चाेरून नेल्याचे त्यांनी सांगितले. यातील एक ट्राॅली सागवान जप्त करण्यात वन अधिकाऱ्यांना यश आले. त्या ट्राॅलीत सागवानाचे २७ नग हाेते.
याच प्रकरणात वन अधिकाऱ्यांनी रामकृष्ण गनमनी यास सिनेस्टाईलने पाठलाग करून मंगळवारी (दि. २७) रामटेक शहरातून ताब्यात घेतले. सागवान वाहतुकीसाठी वापरलेला चिंतामण मेहेरचा ट्रॅक्टर त्याने लपवून ठेवला हाेता. तो हिवराबाजार येथे असल्याची माहिती मिळताच वन कर्मचारी हिवरा बाजारला गेले. तिथून त्याने पळ काढत रामटेक शहर गाठले. कर्मचाऱ्यांनी रामटेकला जाऊन त्याला ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्ताेवर त्याला अटक करण्यात आली नव्हती.
...
‘एफडीसीएम’च्या जंगलातही तस्करी
प्रादेशिकच्या जंगलाला लागूनच ‘एफडीसीएम’ (वन विकास महामंडळ)चे जंगल आहे. आराेपींनी आधी जे आठ ट्राॅली सागवान चाेरून नेले, ते ‘एफडीसीएम’च्या जंगलातील आहे, अशी माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली. वन अधिकाऱ्यांनी एका ट्राॅलीत २७ नग जप्त केले असून, त्याची किंमत १ लाख १२ हजार २८६ रुपये असल्याचे सांगितले. त्यामुळे उर्वरित आठ टाॅलीमध्ये किमान २१६ लाकडे असावीत. या लाकडांची किंमत ही १० लाख रुपयांच्या वर असल्याचेही वन कर्मचाऱ्यांनी खासगीत सांगितले.
....
लाकूड विक्रीचे भंडारा कनेक्शन
आराेपींनी ही सर्व सागवान लाकडे आष्टी, ता. तुमसर, जिल्हा भंडारा येथील ठेकेदाराला विकली. आष्टी हे गाव लेंडेझरीजवळ असल्याचेही वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. चिंतामणने यापूर्वी त्याच ठेकेदाराला त्याच्या वडिलांच्या शेतातील सागवान झाडे ताेडून विकली हाेती. त्यामुळे वन अधिकारी त्या ठेकेदाराचा शाेध घेईल काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
....
वादग्रस्त वनपालाचा समावेश?
‘एफडीसीएम’चे वनपाल निशाद बाॅबिनवाले आणि चिंतामण मेहेर यांच्या ओल्या पार्ट्या व्हायच्या, अशी माहिती चिंतामणने वन अधिकाऱ्यांना दिली. चिंतामणला अटक केल्यानंतर याच कारणावरून चिंतामणच्या पत्नीने निशाद बाॅबिनवाले यांना विचारणा केल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे या सागवान तस्करीत बाॅबिनवाले यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, प्रकरण दडपण्याचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.