एलबीटी कागदोपत्रीच रद्द : ग्राहकांवर महागाईचा बोजा कायमचनागपूर : राज्य शासनाने एलबीटी रद्द केला, पण त्याचा फायदा ग्राहकांना मिळत असल्याचे दिसून येत नाही. आॅटोमोबाईल क्षेत्र, टायर-ट्यूब तसेच स्थानिक घरगुती वस्तूंच्या बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी वस्तूंचे भाव अद्यापही कमी केले नाहीत. एलबीटी असो वा नसो, ग्राहकांना वाढीव भावातच वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. एलबीटी कागदोपत्रीच रद्द झाल्याचे सदर प्रतिनिधीने बाजारपेठेचा फटका मारल्याचे दिसून आले. कॉस्मेटिक, साबण अथवा ब्रॅण्डेड चहाच्या पॅकिंगवर किंमत सर्व करासह असे छापून येत असले तरीही ग्राहकांकडून एलबीटीची आकारणी सुरूच आहे. १आॅगस्टपासून एलबीटी रद्द झाल्याने यापुढे कोणत्याही स्थानिक कराची आकारणी होणार नाही, असा अर्थ होतो. पण विक्रेत्यांनी स्थानिक कर आकारूनच विक्री सुरू ठेवली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर व्यापाऱ्यांनी सांगितले की, व्यवसाय करताना नियमितपणे मालाची साठवणूक करावी लागते. तो माल लवकर विकेल याची गॅरंटी घेता येत नाही. ३१ जुलैपूर्वी सर्व माल विकला गेला असेही नाही. त्यामुळे काही दिवसांपर्यंत एलबीटी छुपी आकारणी करावीच लागेल, असे व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.मॉल वा मोठ्या दुकानांमध्ये संगणकाद्वारे मालाचे बिल देत असेल तर एलबीटी रद्द झाल्याचे शासनाचे परिपत्रक मिळाले नसल्याचे कारण पुढे करीत ते ग्राहकांकडून एलबीटीची वसुली अद्यापही करीत आहेत. नफा कमविणे, हा व्यापाऱ्यांचा त्यांचा मूळ उद्देश असल्यामुळे बाजारात एलबीटीची छुपी आकारणी काही महिने सुरू राहणार असल्याचे दिसून येते. अनावश्यक कर वसुली करणाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केली. एलबीटी रद्द करण्याचा शासन निर्णय असला तरीही ग्राहकांना फायद्यासाठी काही दिवस वाट बघावी लागेल, हे नक्की.(प्रतिनिधी)
कधी येईल स्वस्ताई ?
By admin | Updated: August 3, 2015 02:56 IST