कामठी : कामठी-नागपूर महामार्गावरील सैनिक छावणी परिसरातून वारेगाव-खापरखेड्याकडे जाणाऱ्या बायपास मार्गाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. पूर्णत: सिमेंटीकरण असलेला हा मार्ग नागपूर-जबलपूर तसेच मध्य प्रदेश येथील छिंदवाडा-बैतूल राष्ट्रीय मार्गासह अनेक गावांना जोडणारा आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक कधी सुरू होईल, असा प्रश्न विचारला जात आहे.
या बायपास मार्गाचे काम जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आलेले होते. हा मार्ग अवघ्या चार महिन्यात पूर्ण करण्यात येणार होता. या मार्गाचे बांधकाम करणाऱ्या अभि इंजिनियरिंग कंपनीने लॉकडाऊन काळात या कामाला अधिक वेग दिला. या मार्गावरून स्थानिक वाहनधारकांचीच ये-जा सुरू झाली आहे. चारचाकी वाहनधारकांना सध्या मार्गावरून प्रवेश देण्यात आलेला नाही. या मार्गावरून वारेगाव, बिना, कोराडी, महादुला, खापरखेडा, दहेगाव, सुरादेवी, पारशिवनी इत्यादी परिसरातील नागरिक दुचाकी वाहनांनी ये-जा करीत आहेत. याच मार्गाने कोळसा आणि रेतीची वाहतूक केली जात होती. मात्र जड वाहतुकीमुळे या मार्गाची दुरवस्था झाली होती. त्यामुळे २.५ किलोमीटरच्या या बायपासचे बांधकाम राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाच्या देखरेखीत करण्यात आले.