उमरेड : उमरेड, भिवापूर आणि कुही तालुक्यात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. योग्य नियोजन आखले जात नसल्याने आणि कुणावरही अंकुश नसल्याने येत्या काही दिवसात महामारीचे संकट अधिकच बिकट झाल्यास प्रशासकीय यंत्रणा हात वर करण्याची भाषा बोलेल, असे एकूणच चित्र आतापासूनच दिसून येत आहे. गत पाच महिन्यापासून उमरेड येथील उपविभागीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. तहसीलदार प्रमोद कदम यांच्याकडे प्रभारी कारभार सोपविण्यात आला आहे. कोरोनासारखी गंभीर परिस्थिती रौद्र रूप धारण करीत असताना उमरेड विभागाला नियमित एसडीओ मिळणार कधी, असा सवाल विचारला जात आहे. उमरेड उपविभागीय अधिकारी म्हणून यापूर्वी हिरामण झिरवाळ यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांची मंत्रालयात बदली झाली. त्यांच्या नेतृत्वात तालुक्यात संक्रमणानंतरचे व्यवस्थापन आणि नियोजन योग्य पद्धतीने झाले. कोरोनाच्या विपरीत परिस्थितीत त्यांनी कर्मचाऱ्यांवर योग्य जबाबदारी सोपवीत अनेकांकडून उत्तम काम करवून घेतले होते. प्रभारी एसडीओच्या माध्यमातून उमरेड विभागाची जबाबदारी अवजड आणि अवघड ओझे ठरत आहे. यामुळे तातडीने नियमित उपविभागीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
एक अधिकारी तीन प्रभार
चार महिन्यापूर्वी उमरेड पालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर भिवापूर नगर पंचायतच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला. सुवर्णा दखणे यांच्याकडे कुही नगर पंचायतचासुद्धा कार्यभार असून मुख्याधिकारी एक आणि कारभार तीन ठिकाणचा यामुळे चांगलाच गोंधळ उडत आहे. शहरातील कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता, उमरेड पालिकेस नियमित मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी पालिकेचे माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, माजी उपाध्यक्ष सुधाकर खानोरकर, दिलीप सोनटक्के, प्रकाश वारे, नथ्थूजी मेश्राम आदींनी केली आहे.