सौरभ ढोरे
काटोल : राज्यातील स्मार्ट नगर परिषदांपैकी एक असलेल्या काटोल नगर परिषदेला सध्या पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची प्रतीक्षा आहे. यासोबतच नगर परिषदेच्या महत्त्वाच्या विभागातही अधिकाऱ्यांची वानवा असल्याने सामान्य नागरिकांची लहानसहान कामे रेंगाळली आहेत. येथील मुख्याधिकारी अशोक गराटे यांची महिनाभरापूर्वी बदली झाली. परंतु अद्यापही स्थायी मुख्याधिकारी मिळाले नसल्याने न.प.चा कारभार प्रभारीभरोसे सुरू आहे.
गत सहा महिन्यापासून सुरू असलेल्या राजकीय कुरघोडीमुळे काटोल न.प. चर्चेत आली आहे. यात सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि गुंठेवारीप्रकरण याचा प्रामुख्याने समावेश आहे. या साऱ्यामुळे शहरातील विकास कामांना खीळ बसत आहे. मागील महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालिकेच्या नगर रचना विभागातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. या प्रकरणामुळे स्मार्ट न.प.चा कारभार चव्हाट्यावर आला. त्यामुळे येथील राजकीय कुरघोडी आणि कामाचा ‘ताप’ लक्षात घेता, अधिकारी काटोल न.प.मध्ये येण्यास फारसे उत्सुक नसल्याचे बोलले जात आहे.
गराटे यांच्या बदलीनंतर नरखेड न.प.चे मुख्यधिकारी मानकर यांना काही दिवस काटोल न.प.चे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र लाचकांडानंतर मानकर यांनीही काटोलच्या प्रभारातून मुक्त करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. ती मान्यही करण्यात आली.
नगर रचना विभाग न.प.चा कणा असतो. मात्र येथील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक झाल्यानंतर त्यांच्या कामाची जबाबदारी इतरांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांना विषय समजून घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे नगर रचना विभागाचा कामाचा वेग मंदावला आहे.
राजकीय हेवेदावे बाजूला ठेवले तर गत दहा वर्षात काटोल शहराचा लूक बदलला आहे, हे कुणीही नाकारणार नाही. शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे. येथील विकास कामामुळे बाहेरील नागरिकांचा काटोल शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. हे येथील वाढत्या नागरीकरणावरूनच लक्षात येते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने राजकारण बाजूला ठेवत शहराच्या विकासासाठी न.प.ला पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सामान्य काटोलकर करीत आहेत.
अधिकारी प्रतिनियुक्तीवर
काटोल पालिका प्रशासनात कार्यरत असलेले कर प्रशासकीय सेवेतील सचिन पाडे यांना नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात तर लेखा परीक्षक संदीप बुरुंगले हे स्वच्छ महाराष्ट्र अभियान मुंबई येथे संलग्नित आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता रविश रामटेके हे अपघातात जखमी असल्याने रजेवर आहेत. महत्त्वाची पदे रिक्त असल्याने आणि मुख्याधिकाऱ्यांचा कारभारी प्रभारीवर असल्याने सामान्य नागरिकांना मात्र फटका बसतो आहे.
तहसीलदारांची रोज परीक्षा
न.प.च्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार सध्या काटोलचे तहसीलदार अजय चरडे यांच्याकडे आहे. तालुक्यातील १८९ गावांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना पालिकेत वेळ देता येणे शक्य होत नाही. यामुळे तालुका आणि शहरातील नागरिकांच्या कामांना न्याय देताना चरडे यांना सध्या रोज परीक्षेला पुढे जावे लागत आहे.