लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : नागपूर-आंभाेरा (ता. कुही) मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. त्यातच काही दिवसापासून मांढळ (ता. कुही) येथील किन्ही (फाटा) ते वडेगाव(फाटा)पर्यंतच्या मार्गालगत नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यासाठी लगतची घरे व दुकानांचा काही भाग अतिक्रमित असल्याचे दाखवून ताेडण्यात आले. परंतु, यात अडथळा ठरणारे ट्रान्सफार्मर व विजेचे खांब अद्यापही स्थानांतरित केले नाही. ते कधी हटवणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
हा मार्ग मांढळ येथून गेला असून, त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मांढळ येथे या मार्गालगत नाल्याच्या बांधकामाला दाेन वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली. ते काम अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. किन्ही (फाटा) ते वग (फाटा) दरम्यानच्या एक किमी लांबीच्या नालीचे बांधकाम अपूर्ण आहे. विशेष म्हणजे, या भागात विजेचे सहा ट्रान्सफार्मर असल्याने पूर्वी येथे दोन्ही बाजूला नाल्या नव्हत्या. येथील ट्रान्सफार्मर हटविण्यात न आल्याने नाल्याचे बांधकाम पूर्ण करणे शक्य झाले नाही.
दरम्यान, आजवर बंद असलेले नाल्याचे बांधकाम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले. त्यासाठी राेडलगतची काही घरे व दुकानांचा भाग ताेडण्यात आल्याने नागरिकांनाही नुकसान सहन करावे लागले. परंतु, कंत्राटदाराने विजेच्या सहाही ट्रान्सफार्मरला अद्याप हात लावला नाही. नालीच्या बांधकामासाठी सहाही ट्रान्सफार्मर हटवून या भागातील विजेचे ४० खांब स्थानांतरित करावे लागतात. हे काम दाेन वर्षात पूर्ण केले नाही. ही बाब त्रासदायक ठरत असल्याने सहा ट्रान्सफार्मर व विजेचे खांब तातडीने स्थानांतरित करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.