लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : महावितरण कंपनीने चालू महिन्याचे विजेचे बिल अद्यापही ग्राहकांना दिले नाही. त्यामुळे तीन महिन्यांची एकमुस्त बिले देण्याची आणि त्यांची सक्तीने वसुली केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक अडचणींमुळे एकमुस्त बिले भरणे कठीण जात असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केली असून, याला महावितरण कंपनीचा अनागाेंदी कारभार जबाबदार असल्याचा आराेपही त्यांनी केला आहे.
मागील वर्षी काेराेना संक्रमणामुळे महावितरण कंपनीने ग्राहकांना दर महिन्याला विजेच्या बिलाचे वितरण केले नाही. शिवाय, रीडिंगही घेतले नव्हते. त्यातच कंपनीने एकमुस्त बिले दिल्याने अनेकांना ते वेळीच भरणे शक्य झाले नाही. त्यातच कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा देत ग्राहकांकडून संपूर्ण बिलाच्या रकमेची पद्धतशीरपणे वसुली केली. त्या अडचणीच्या काळात महावितरण कंपनीने आपल्याला वेठीस धरल्याचा आराेप अनेक ग्राहकांनी केला.
साधारणत: मीटर रीडिंग घेतल्यानंतर १५ दिवसांनी ग्राहकांना विजेच्या बिलांचे वितरण केले जाते. काेराेना संक्रमण वाढत असल्याने ते राेखण्यासाठी राज्य शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा केली. याच काळात ग्राहकांना विजेच्या बिलांचे वितरण करावयाचे हाेते. मात्र, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ते अद्यापही केले नाही. बिले न मिळाल्याने ती भरायची कशी, असा प्रश्नही ग्राहकांसमाेर निर्माण झाला आहे. या काळात महावितरण कंपनीने बिलांचे वितरण केले असते तर वेळीच भरणे शक्य झाले असते. शिवाय, विलंब शुल्क वाचला असता. एकमुस्त बिले दिल्यास त्यात अधिभार व इतर शुल्क लावून येणार असल्याने बिलाची एकूण रक्कम वाढणार आहे. ती बिले वेळीच न भरल्या वीजपुरवठा खंडित करण्याचा इशाराही दिला जाणार असल्याने ग्राहकांनी सांगितले. त्यामुळे ही बिले भरण्यासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे.
....
ऑनलाईन बिले भरण्यास अडचणी
ग्रामीण भागातील बहुतांश ग्राहक विजेच्या बिलांचा भरणा ऑफलाईन करतात. त्यामुळे त्यांना बिलांची प्रतीक्षा करण्यावाचून गत्यंतर नसते. बिले न मिळाल्याने नेमकी किती रक्कम कुठे भरायचा, असा प्रश्नही ग्राहकांसमाेर निर्माण झाला आहे. लाॅकडाऊन आणखी किती काळ राहणार आणि महावितरण कंपनी बिलांचे वितरण कधी करणार हे कळायला मार्ग नाही. कंपनीने एकमुस्त दिले दिल्यास ती भरणे जड जणार असल्याचे ग्राहकांनी सांगितले.